Home Breaking News त्या…. रेतीसाठ्याची विल्हेवाट, 78 लाखाचा दंड

त्या…. रेतीसाठ्याची विल्हेवाट, 78 लाखाचा दंड

2377
C1 20240404 14205351

तहसीदारांची धडाकेबाज कारवाई

रोखठोक | चिखलगाव ग्रामपंचायतीच्या ताब्यात ठेवलेल्या रेतीसाठ्याचा पंचनामा करून महसूल प्रशासनाने प्रकरण पंजीबध्द केले होते. मात्र ग्रामपंचायतीने रीतसर परवानगी न घेता रेतीची इतरत्र वाहतूक केली. या प्रकरणी तहसीलदार निखिल धुळधर यांनी दि. 23 मार्चला आदेश पारित करत 78 लाख 33 हजार 770 रुपये दंडाची आकारणी केली आहे.

चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 73/4 या निवासी अकृषक ले जाऊट मधील खुल्या जागेत 345.10 ब्रास रेतीसाठा करण्यात आला होता. तो रेतीसाठा पंजीबध्द करून ग्राम पंचायतीच्या ताब्यात देण्यात आला होता. सदर रेती ही नमुद आढळलेल्या ठिकाणापासून इतरत्र तसेच अन्यत्र अवैधरित्या वाहतुक केली जाणार नाही असे ग्राम पंचायतीने स्पष्ट केले होते.

रेतीच्या सुरक्षेकरीता पूर्णवेळ कर्मचारी नेमण्याची ग्वाही ग्रामपंचायतीने दिली होती. तसेच संपुर्ण जबाबदारी स्वीकारत कायदे, नियम, परिपत्रके इत्यादी ला अनुसरुन कारवाईस पात्र राहण्याची हमी देण्यात आली होती. याप्रकरणी रेतीच्या सुरक्षेची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आली होती. कोणत्याही प्रकारची अवैद्य वाहतूक किंवा अवैद्य बाब सदर ठिकाणी आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशीत करण्यात आले होते.

ग्रामपंचायतीच्या ताब्यातील रेतीचा गैरवापर होत असल्याची तक्रार अशोक नागभीडकर यांनी 20 मार्चला महसूल प्रशासनाकडे केली होती. यातक्रारीच्या माध्यमातूनच ताब्यातील रेतीची विल्हेवाट लावताना महसूल व खनिकर्म विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत ग्रामपंचायतीला दोषी ठरविण्यात आले आहे. सदर रेती ही फक्त ताब्यात देण्यात आली होती. मात्र कोणतीही परवानगी न घेता रेतीची अवैध वाहतुक केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम1966 चे कलम48 (7) तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब नुसार 78 लाख 33 हजार 770 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वणी: बातमीदार