Home Breaking News पुरपीडितांच्या व्यथा राज ठाकरे यांच्या ‘दरबारात’

पुरपीडितांच्या व्यथा राज ठाकरे यांच्या ‘दरबारात’

671

जाणून घेतली आपत्ती बाबतची सत्यस्थिती

वणी: विधानसभा क्षेत्रात नैसर्गिक आपत्ती ने भीषण हाहाकार माजवला होता. हजारो हेक्टर शेती खरडून गेली, बरीचशी गावे बाधित झाली तर अनेकांची संसारे उघड्यावर आल्याचे वास्तव, पुरपीडितांच्या व्यथा राज ठाकरे यांनी जाणून घेत नैसर्गिक आपत्ती बाबतचा आढावा घेतला. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी येथील सत्यस्थितीची माहिती मुंबई येथे मंगळवार दि. 23 ऑगस्टला पारपडलेल्या बैठकीत दिली.

मुंबईतील शिवतीर्थ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी मनसे पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय मुद्द्यांवर चौफेर टोलेबाजी केली. पदाधिकारी आणि नेतेमंडळींना कानपिचक्या दिल्या. “आपल्याला ताकदीने आणि हिंमतीने या निवडणुका लढवायच्या आहेत. तडजोड करून निवडणुका लढवू नका. नुसते लाचार होऊन निवडणुका लढवू नका. शून्य किंमत राहील तुम्हाला”, असंही ते म्हणाले.

बैठक संपन्न झाल्यानंतर राजू उंबरकर यांनी जिल्हयातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवतीर्थ या निवासस्थानी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी मतदारसंघात उद्भवंलेल्या नैसर्गिक आपत्तीची विस्तृत माहिती, स्थानिकांना सहन कराव्या लागणाऱ्या यातना, शासनाची होणारी दिरंगाई आणि मनसे ने राबवलेली “सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेची” सखोल महिती राज ठाकरे यांना दिली.

विदर्भातील मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या वणी विधानसभा क्षेत्रात राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सैनिक झपाटल्यागत संघटना बांधणी करताहेत. तालुक्यात ठीक ठिकाणी पक्ष प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तरुण, महिला व अन्य राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा जथ्था मनसेत प्रवेश करताना दिसत आहे.

वणी, मारेगाव व झरी तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झंझावात निर्माण केला आहे. महाराष्ट्र सैनिक सामाजिक, जनहितार्थ उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहेत. त्यातच पक्षाची भूमिका, राज ठाकरे यांचे विचार रुजविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्यानेच सर्वसामान्यांची “नाळ” मनसे सोबत जुळताना दिसत आहे.
वणी: बातमीदार