Home Breaking News महिला सरपंचासह तिघांनी गावातील युवकाला ‘बदडले’

महिला सरपंचासह तिघांनी गावातील युवकाला ‘बदडले’

1912

गाव विकासाचे मुद्दे रेटणे भोवले

वणी: तालुक्यातील कोलार (पिंपरी) येथे वास्तव्यास असलेला 25 वर्षीय युवक, गावविकासाचे मुद्दे ग्रामसभेत मांडावे याकरिता सरपंच यांच्या घरी गेला होता. त्याला महिला सरपंचाने शिवीगाळ केली तर तिचा पती व अन्य एका व्यक्तीने मारहाण केल्याची घटना शनिवार दि. 28 मे ला सकाळी 10:30 वाजता घडली असून वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक असतो, ग्राम विकासाकरिता कटिबद्ध असल्याने गावातील प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणे गरजेचे असते. गाव विकासाच्या संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी राजकीय हेवेदावे दूर सारून कर्तव्यपूर्ती अभिप्रेत असताना चक्क शिवीगाळ आणि मारहाण करणे निषेधार्ह आहे.

दिपक रमेश नरवाडे (25) हा तरुण कोलार (पिंपरी) येथील निवासी आहे. ग्राम विकासाचे काही प्रश्न लिहलेला अर्ज घेवून तो सरपंच साधना बंडु उईके (30) यांना शुक्रवारी भेटायला गेला होता. यावेळी उद्या सकाळी घरी या असे त्याला सांगितल्याने तो शनिवारी सकाळी सरपंच यांच्या घरी ग्रामपंचायत कर्मचारी रमेश नागतुरे याला सोबत घेवून गेला होता.

त्या युवकाने महिला सरपंच यांची भेट घेतली व अर्ज दिला तसेच अर्ज मिळाल्याची प्रत द्यावी अशी विचारणा केली असता “तुझे कशाचे प्रश्न, तुला कशाचे उत्तर देवू” असे म्हणत थापडाने मारून शिवीगाळ केली. तुम्ही शिवीगाळ का करता अशी विचारणा करताच सरपंच यांचे पती बंडू उईके (35) व दिपक वासुदेव कांबळे (35) रा. गोवारी या तिघांनी मारहाण केल्याची तक्रार वणी पोलिसात करण्यात आली आहे.

या प्रकरणी वणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र सरपंचपदी असलेल्यांनी ग्राम विकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. विकासाचे मुद्दे कितपत योग्य व नियमानुसार आहे हे तपासणे आवश्यक आहे. मात्र राजकीय विरोध आणि सत्तेचा गर्व गावातील शांतता भंग करण्यासाठी कारणीभूत ठरणार असल्याचे या घटनेतून उघड होत आहे.
वणी: बातमीदार