Home Breaking News तेथील…निकृष्ठ जेवण म्हणजे ‘समाजविघातक कृत्य’

तेथील…निकृष्ठ जेवण म्हणजे ‘समाजविघातक कृत्य’

395

प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची हेळसांड

कंत्राट रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

वणी- येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना निकृष्ट दर्जाचे व नियमानुसार जेवण देण्यात येत नसल्याची तक्रार शिवसेनेला प्राप्त झाली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, विक्रांत चचडा यांनी धडक येत पाहणी केली असता खरे वास्तव समोर आले. रुग्णालयातील निकृष्ठ जेवण म्हणजे समाजविघातक कृत्य असल्याचे मत व्यक्त करत तात्काळ कंत्राट रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

वणी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना सकस, पौष्टीक जेवण मिळावे याकरिता शासन सर्वोतोपरी प्रयत्न करतात. येथील कंत्राट नाशिक येथील एका संस्थेला दिले आहे मात्र राजकीय बाळाचा वापर करीत येथील एका ‘पुढाऱ्याने’ खानावळ चालविण्यासाठी घेतल्याची चर्चा आहे. आणि हाच “सब” कंत्राटदार शासनाच्या नियमाला तिलांजली देत आर्थिक हव्यासापोटी मनमर्जी करीत असल्याचे वास्तव उजागर होत आहे.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा व काही शिवसैनिक ग्रामीण रुग्णालयातील सत्यता पडताळणी करिता बुधवारी रुग्णालयात धडकले. त्यांनी प्रसूतीसाठी भरती असलेल्या महिलांकडे जेवणाविषयी चौकशी केली.

मंगळवारी सायंकाळच्या जेवणात भाजीच मिळाली नसल्याचे महिलांनी सांगितले. तसेच बुधवारी सकाळी चहादेखील मिळाला नसल्याची तक्रार या महिलांनी केली. त्याप्रमाणेच दुपारी १२ वाजता नंतर सुद्धा महिलांसाठी जेवण पोहोचले नव्हते. यावरुन संबंधित कंत्राटदारांची कार्यपद्धती चव्हाट्यावर आली आहे.

शिवसैनिकांनी जेवणाचा शासकीय तक्ता तपासला असता, तक्त्यावरील खाद्यपदार्थच दिले जात नसल्याची बाब उघड झाल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच रुग्णालयातील जेवणाचे कंत्राट एका महिलेच्या नावावर असल्याचे स्पष्ट करीत अनेक महिन्यांपासून या रुग्णालयात हा प्रकार सुरू असल्याचा आरोप शरद ठाकरे यांनी केला आहे.

ग्रामीण रुग्णालयातील खानावळी बाबत असलेले संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे अन्यथा रुग्णालयाच्या आवारात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शरद ठाकरे, विक्रांत चचडा व शिवसैनिकांनी दिला आहे.