Home Breaking News आणि…पंचायत समिती कार्यालयाच्या दालनात पहुडलेला ‘कुत्रा’

आणि…पंचायत समिती कार्यालयाच्या दालनात पहुडलेला ‘कुत्रा’

1170
C1 20241123 15111901

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अधिकारी बेपत्ता
मुख्यालयाला दांडी, ग्रामस्थांची गैरसोय

सुनील पाटील | सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सोमवारी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहावे असा दंडक आहे. मात्र हमखास दांडी मारण्यात तरबेज असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वठणीवर कोण आणणार हाच खरा प्रश्न निर्माण होत आहे. सोमवार दि.28 नोव्हेंबरला पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम विभागाच्या दालनात चक्क कुत्रा विसावा घेत असल्याचे चित्र बघायला मिळाले.

झरी जामनी हा आदिवासी बहुल तालुका आहे. याभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सर्वसमावेशक विविधांगी योजना राबविण्यात येत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यतत्पर असणे अभिप्रेत आहे. मात्र शासनाचे जावई असल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

झरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. यामुळे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी बिनधास्त झाले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच कार्यालयीन शिस्त लयास गेल्याचे उजागर होत आहे.

सोमवारी पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम विभागाच्या दालनात, अधिकाऱ्यांच्या खुर्ची लगत ‘श्वान’ मस्त विसावा घेत होता. त्याला हुसकवण्याचे सौजन्य कार्यालयातील शिपायाने दाखवले नाही. कार्यालयात पहुडलेला कुत्रा बघताच एका सजग नागरिकाने तो क्षण मोबाईल फोन मध्ये कैद केला. ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या कार्यालयातील अनागोंदी मात्र खरे वास्तव अधोरेखित करताहेत.
वणी : बातमीदार