● वांजरी जवळ घडली घटना, ग्रामस्थ आक्रमक
वणी: नांदेपेरा मार्गावर अपघाताच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. भरधाव अवजड वाहने कर्दनकाळ ठरताना दिसत असून मंगळवार दि. 23 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ट्रकने ऑटोला जबर धडक दिली. या अपघातात ऑटो पलटी झाला असून दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.

नांदेपेरा मार्गावर सातत्याने अपघाताची शृंखला वाढली आहे. भरधाव हाकण्यात येणारी खनिज व गौण खनिजांची जड वाहनातून होणारी वाहतूक खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरते आहे. त्या मार्गावरील स्थानिकांनी प्रशासनाला वारंवार निवेदने, तक्रारी दिल्यात मात्र कारवाई शून्य असल्याने स्थानिकांत प्रचंड रोष निर्माण होत आहे.
स्नेहा हरी बलकी (18) व शिवम श्रीकांत मेश्राम (11) असे जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. ते आपल्या गावी ऑटो क्रमांक MH-29- AM- 0698 ने लाखापुर या गावी जात असताना मागाहून येत असलेल्या ट्रक क्रमांक MH -34 -BG -6427 ने जबर धडक दिली.
या अपघातात ऑटो मधील दोघे गंभीर जखमी झाले असून अन्य प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटना घडताच परिसरातील नागरिकांनी जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे.
वणी: बातमीदार