Home Breaking News निवडणूकांची रणधूमाळी आणि कार्यकर्त्यांची ‘चांदी’

निवडणूकांची रणधूमाळी आणि कार्यकर्त्यांची ‘चांदी’

324

राजकीय पक्षात हालचालींना वेग

वणी: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. पतसंस्था व सहकारी संस्थाच्या निवडणूका होताहेत. कार्यकर्त्यांत जोश संचारावा याकरिता सहकार क्षेत्रातील दिग्गज सढळ हस्ते सरसावल्याने कार्यकर्त्यांची चांदी होत आहे .

Img 20250619 wa0016

मागील दोन वर्षाचा कोरोना कालखंड अतिशय सुस्तावलेल्या अवस्थेत होता. कार्यकर्त्यांत मरगळ आली होती ती झटकून काढण्याची संधी आता सर्वच राजकीय पक्षांना मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. तर सहकार क्षेत्रातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.

Img 20250103 Wa0009

सहकार क्षेत्रातील नावाजलेल्या संस्थांच्या निवडणुका होताहेत. विदर्भातील 800 कोटीची वार्षिक उलाढाल असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार विरुद्ध काँग्रेसचेच ऍड. देविदास काळे यांच्या पॅनल मध्ये चुरशीची लढत झाली मात्र ऍड. काळे यांनी पुन्हा एकदा आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले.

वसंत जिनींग सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल 3 कोटीच्या घरात असल्याने अनेक दिग्गजांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. तब्बल अकरा हजार सभासद असलेल्या संस्थेचे कार्यक्षेत्र वणी, मारेगाव, झरी या तिन तालुक्यात आहे. मुकूटबन, मारेगाव, मार्डी, शिंदोला, वणी येथे जिनींग आहे. सोबतच शहरात शेतकरी मंदीर, लाॅन च्या माध्यमातुन संस्थेने आर्थीक स्त्रोत निर्माण केले आहे.

नुकत्याच पारपडलेल्या रंगनाथ च्या निवडणुकी नंतर वसंत जिनिंग, बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. प्रचंड रणधुमाळी रंगणार आहे. भाजप, काँग्रेस, मनसे, शिवसेना आणि सहकार क्षेत्रातील धुरंधर आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. रणसंग्रामात हवा निर्माण करायची असेल तर कार्यकर्त्यांना चांगलेच झेलावे लागणार आहे.

सद्यस्थितीत कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहे. रंगनाथ च्या निवडणुकीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच चांदी झाली. आता येणाऱ्या निवडणुकात सुद्धा कार्यकर्तेच मोलाची भूमिका बजावणार आहे. दोन वर्षे कार्यकर्त्यांत आलेली मरगळ एकाच निवडणुकीत झटकल्यागेल्याने येणाऱ्या निवडणुका चुरशीच्या होणार हे निश्चित.
वणी: बातमीदार