● आधार कार्ड निघत नसल्याने त्रस्त
● पंतप्रधान यांना पाठवले निवेदन
वणी | तालुक्यात जिथे- जिथे आधार कार्ड काढण्याचे सेंटर आहे तिथे योग्य दस्तऐवजासह प्रयत्न केले मात्र अद्याप आधारकार्ड प्राप्त झाले नाही. यामुळे हतबल तरुणाने SDO मार्फत चक्क पंतप्रधान यांनाच निवेदन पाठवून “वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे घोषित करून याबाबत शासन नियमानुसार मिळणारे अनुदान शासन जमा करावे” अशी याचना केली आहे. हतबल तरुणाचा आधारासाठी होत असलेला संघर्ष धक्कादायक आहे.

राजेंद्र अरुण खोब्रागडे असे तरुणाचे नाव आहे तो आपल्या परिवारासह येथील भीमनगर परिसरात वास्तव्यास आहे. मागील अकरा वर्षांपासून ते आधारकार्ड मिळावे याकरिता संघर्ष करत आहे. अनेकांना अनेक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. कोणाला उदरनिर्वाहासाठी संघर्ष तर अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सर्वसामान्यांच्या पाचवीलाच संघर्ष पुजला आहे.
राजेंद्र खोब्रागडे यांनी तालुक्यातील सर्वच सेंटरवर आधारकार्ड मिळावे याकरिता प्रयत्न केले आहे. संपूर्ण कागदपत्रे, पुरावे सादर करून सुद्धा आधारकार्ड निघण्यास नेमकी अडचण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर याबाबत ठोस कारण सांगण्यात येत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
आधार क्रमांक ओळखीचा पुरावा आहे, आधार कायमस्वरुपी आर्थिक पत्ता म्हणून वापरता येऊ शकतो व त्यामुळे समाजातील उपेक्षित व दुर्बल घटकांना मदत होते व म्हणूनच ते सर्वांना न्याय व समानता देणारे साधन आहे. यामुळेच सरकार विविध प्रकारचे अनुदान, लाभ व सेवा देताना केवळ रहिवाशाचा आधार क्रमांक वापरतात. तर शासनाने आधारकार्ड बंधनकारक व सक्तीचे केल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मत हतबल तरुणाने व्यक्त केले आहे.
राजेंद्र खोब्रागडे यांनी अखेर पंतप्रधान यांनाच उप विभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठवले आहे. या निवेदनातून त्यांनी आपली हतबलता नमूद केली असून आधारकार्ड शिवाय होणारा मनस्ताप व्यक्त करत थेट मृत घोषित करावे अशी विनंती केल्याने प्रशासन यावर काय तोडगा काढणार याकडे लक्ष लागले आहे.
वणी: बातमीदार