● खत रॅक व पीक विमा प्रश्नावर आक्रमक, कृषिमंत्र्यांसोबत विस्तृत चर्चा…..
Political News | वणी विधानसभा क्षेत्रासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार संजय देरकर यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मंत्रालयात भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. यावेळी खत पुरवठा व्यवस्था आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना हे दोन प्रमुख विषय बैठकीत चर्चिले गेले यावर तात्काळ निर्णय घेणार असल्याचे आश्वाशीत केले. BIG NEWS… MLA Darekar is firm on a serious issue
आमदार देरकर यांनी वणी उपविभागासाठी येणाऱ्या खतांच्या रेल्वे रॅक सध्या धामणगाव येथे उतरवल्या जात असल्याने वाहतूक खर्च वाढत असून खतांचा पुरवठा उशिराने होत असल्याची बाब कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना वेळेत खते उपलब्ध व्हावीत यासाठी खत रॅक थेट मुकूटबन किंवा कायर रेल्वे स्थानकावर उतरविण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या मागणीमुळे वाहतूक खर्चात बचत होऊन वितरण प्रक्रिया अधिक गतिमान होईल तसेच वणी परिसरातील शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध होईल, असे देरकर यांनी सांगितले. यावर कृषिमंत्री भरणे यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून व्यवहार्यता तपासण्याचे आणि शेतकरीहिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत यवतमाळ जिल्ह्याचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पुनःसमावेश कायम ठेवण्याचाही मुद्दा जोरकसपणे मांडण्यात आला. यवतमाळ हा कृषिप्रधान व कापूस उत्पादक जिल्हा असून येथील शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळसदृश परिस्थिती व कीडरोगांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे देरकर यांनी नमूद केले.
पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक संरक्षणाचे महत्त्वाचे साधन असून जिल्ह्याचा योजनेतून वगळलेला समावेश कायम ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागाकडून तातडीने माहिती मागवून सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
बैठकीनंतर आमदार संजय देरकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. कृषिमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे वणी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ROKHTHOK






