● प्रशासनाच्या बेफिकिरीवर तीव्र रोष, घटनेला जबाबदार कोण?
Sad News :
दारव्हा-नेर मार्गालगत सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामामुळे बुधवारी चार निरागस मुलांचे प्राण गेले. पाण्याने भरलेल्या प्रचंड खड्डयात पोहण्यासाठी गेलेल्या या मुलांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने शहरात शोककळा पसरली असून, प्रशासनाच्या बेफिकिरीवर तीव्र रोष व्यक्त होत आहे. Four innocent children died, went swimming and drowned in the water
रीहान असलम खान (13), गोलु पांडुरंग नारनवरे (10), सोम्या सतीश खडसन (10) आणि वैभव आशीष बोधले (14) हे चार निष्पाप जीव एका क्षणात हिरावून नेली. कुटुंबीयांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, घडलेल्या दुर्दैवी घटनेने समाजमन सुन्न झाले तर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

वर्धा-यवतमाळ-नांदेड हा महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्ग जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सुरू करण्यात आला. मात्र या प्रकल्पामध्ये सुरक्षा हा मुद्दा कोणीच गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. पुलांसाठी खोदलेले खड्डे पावसामुळे तुडुंब भरलेले आहेत. हे धोकादायक जलकुंड बालकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कुंपणं, सूचना फलक किंवा सुरक्षा रक्षक नसणे म्हणजे निष्काळजीपणाचं परमोच्च उदाहरण आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, रेल्वे प्रशासन व ठेकेदारांची निष्काळजी वृत्तीच या दुर्घटनेला जबाबदार आहे. मोठमोठ्या प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी फोटोसेशन करणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आता कुठे आहेत, असा सवाल जनतेतून केला जात आहे.
दरवेळी अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होते, ही शोकांतिका आपल्या व्यवस्थेतील बेफिकिरीची चीड आणणारी आहे. विकासाच्या नावाखाली होणारे असे बळी थांबवायचे असतील तर रेल्वे प्रशासनाने तातडीने सुरक्षाव्यवस्था उभारून जबाबदारी स्वीकारावी असे मत व्यक्त होत आहे.
Rokhthok






