Home Breaking News उच्च प्रतीच्या कोळशाची संघटित हेराफेरी !

उच्च प्रतीच्या कोळशाची संघटित हेराफेरी !

● शासनाला कोट्यवधींचा फटका ● वीज उत्पादनावर ओढवणार संकट

C1 20260224

शासनाला कोट्यवधींचा फटका
वीज उत्पादनावर ओढवणार संकट

Rokhthok :
वणी उत्तर क्षेत्रातील उकणी कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा वाहतुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक कंत्राटदार असलेल्या कृष्णा इन्फ्रा ट्रान्सपोर्ट कंपनी कोळसा खाणीतून उचल केलेला उच्च प्रतीचा कोळसा खुल्या बाजारात विकून कचरा व चुरी रेल्वे सायडिंगवर रिचवत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरक्षा व्यवस्थेच्या निदर्शनास आल्याने खळबळ माजली आहे. Organized fraud of high-quality coal!

प्राप्त माहितीनुसार, उकणी खाणीतून निघालेला उच्च दर्जाचा कोळसा अधिकृत रेल्वे सायडिंगवर थेट पोहोचवण्याऐवजी वणीतील लालपुलिया परिसरातील खासगी कोल डेपोवर उतरवला जात होता. तेथे चांगल्या प्रतीचा कोळसा वेगळा करून खुल्या बाजारात जास्त दराने विक्री केली जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर ट्रकमध्ये कमी दर्जाचा कोळसा व कोळसा चुरी (बेड मटेरियल) भरून रेल्वे सायडिंगवर पाठवला जात होता. हा संपूर्ण प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवला जात होता.

IMG 20260511 WA0005

सोमवारी रात्री रेल्वे सायडिंग प्रभारी अधिकाऱ्यांनी CG-11-BM-9033 व CG-11-BM-3214 या दोन ट्रकांची तपासणी केली असता, लोड केलेला कोळसा निर्धारित दर्जानुसार नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. तत्काळ दोन्ही ट्रक रोखण्यात आले, या गंभीर प्रकारची दखल घेत वेकोली अधिकाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता मात्र, वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत.

Img 20250103 Wa0009

सूत्रांच्या माहितीनुसार, हा कथित प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू होता. निष्पक्ष व सखोल चौकशी झाल्यास कोट्यवधी रुपयांच्या महसूल नुकसानीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कमी प्रतीचा कोळसा जर वीज निर्मिती कंपन्यांना पुरवण्यात आला असेल, तर त्याचा थेट परिणाम उत्पादन क्षमतेवर होऊ शकतो. विशेषतः महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी (महाजनको) सारख्या संस्थांना दर्जाहीन कोळसा मिळाल्यास राज्याच्या वीज व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

या संपूर्ण प्रकरणात संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीबरोबरच खाण क्षेत्रातील सब-एरिया मॅनेजर, जीपीएस नियंत्रण अधिकारी व सुरक्षा अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार दीर्घकाळ सुरू असताना देखरेख यंत्रणा नेमकी काय करत होती? हा केवळ निष्काळजीपणा होता की संगनमत? याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे.
Rokhthok