राजू उंबरकरांचा पुढाकार, जीवनावश्यक साहित्य रवाना

वणी बातमीदार: कोकणात आलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपले सर्व काही गमवावे लागले असून हजारो कुटुंब बेघर झाली आहे. त्या बाधीत कुटुंबाना मदत करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेवरून राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या पुढाकारात शुक्रवार दि. 30 जुलै ला जीवनावश्यक साहित्य घेऊन एक ट्रक रवाना झाला आहे.
कोकणात मागील आठवड्यात प्रचंड पाऊस झाला त्यामुळे कोकणातील नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली, अन्न, कपडे, रोख रकमा पुरात वाहून गेल्या, अनेकांचे बळी गेले. नैसर्गिक आपत्ती ने वाताहत झालेल्या कोकणातील पीडित परिवाराला मदत व्हावी याकरिता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केले होते. विदर्भातून मनसेचा गढ असलेल्या वणी विभागाचे नेते तथा राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राजसाहेबांच्या आदेशाचे पालन करत जीवनावश्यक साहित्याची पहिलीच खेप रवाना केली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार, प्रभारी तहसीलदार विवेक पांडे, ठाणेदार वैभव जाधव, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष अशोक इंगोले, गजानन कासावार यांची उपस्थिती होती.
मनसेच्या वतीने 1 हजार ब्लँकेट, 1 हजार साड्या, 3 हजार बिस्कीट पुडे, 3 हजार पाणी बॉटल, 5 टन तांदूळ, दीड टन डाळ, एक हजार टॉवेल, झटपट तयार होणाऱ्या नास्त्याचे साहित्य, यासोबतच अन्य महत्वपूर्ण साहित्याचा समावेश आहे. सदर साहित्याची पहिली खेप रवाना करतांना मनसेचे संतोष रोगे, धनंजय त्रिंबके, रमेश सोनूले, अनिल ढगे, अजिद शेख, बंडू येसेकर, अमोल मसेवार, अरविंद राजूरकर, संस्कार तेलतुंबडे, संकेत गंधारे यांचेसह शेकडी मनसैनिक उपस्थित होते.