Home वणी परिसर समर्थांच्या साहित्यात स्वयं व्यवस्थापनाचे सर्व सिद्धांत – डॉ. प्रसाद खानझोडे

समर्थांच्या साहित्यात स्वयं व्यवस्थापनाचे सर्व सिद्धांत – डॉ. प्रसाद खानझोडे

161

वणी येथे व्याख्यान

वणी:-“समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य केवळ आध्यात्मिक चिंतनाचा विषय नसून मानवी जीवनातील सर्व पैलूंना प्रकाशित करणाऱ्या त्या साहित्यात स्वयं व्यवस्थापनाचे सर्व सिद्धांत सुस्पष्ट केलेले आहेत. या नवीन परिभाषेत आपल्या प्राचीन वारशाचे निरूपण आपण केले नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही.

आधुनिक काळात स्वयं व्यवस्थापनाचे सांगितलेले सर्व सिद्धांत समर्थांच्या साहित्यात ठायी ठायी भरलेले दिसतात. त्या अनुषंगाने या साहित्याचा अभ्यास ही काळाची आवश्यकता आणि वेगळ्या आनंदाचा अनुभव आहे” असे विचार लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी चे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी व्यक्त केले.

विदर्भ साहित्य संघाच्या वतीने नगर वाचनालयात आयोजित पद्मविभूषण लोकनायक बापूजी अणे आणि महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास जयंतीच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात ते आपले विचार व्यक्त करीत होते.याप्रसंगी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघ वणीचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे कार्याध्यक्ष माधव सरपटवार उपस्थित होते.

या दोनही महान विभूतींच्या छायाचित्राचे अनावरण करीत सुरू झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माधव सरपटवार यांनी या दोघांच्या कार्याचा आणि त्यांचा वणीशी असलेल्या ऋणानुबंधाचा परिचय करून दिला.शालांत आणि उच्च माध्यमिक परीक्षेत सर्वोच्च यश प्राप्त केल्याबद्दल गौरांग सरमुकदम आणि ओंकार अणे यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यावाचस्पती स्वानंद  पुंड यांनी वक्त्यांचा परिचय करून दिल्यानंतर आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीतील व्याख्यानात मॅनेजमेंट या शब्दाची मॅनेज मेन अशी फोड करत शेवटी असणाऱ्या टी चा अर्थ टास्क, टेक्निक, टॅक्ट, थिंक आणि टोटल असे सांगत व्यवस्थापन शास्त्राची विविध सूत्रे त्यांनी उलगडून दाखविली.

या सगळ्याचे निरूपण करताना,

वक्त्यांनी ,

कोमल वाचा दे रे राम!

विमल करणी दे रे राम !

प्रसंगी ओळख दे रे राम !

धूर्तकला मज दे रे राम !!

या करुणाष्टकाचा आधार घेत त्यातून ही सूत्रे कशी अभ्यासता येतात? याचे सविस्तर वर्णन केले.

इगो, श्रेयाची लढाई,सज्जनांचे सक्षमीकरण, क्षुल्लक संघर्ष, व्यक्ती आणि वर्तन यांचा चतुर्विध सहसंबंध, परिवर्तनातह अनिवार्य स्थैर्य, इगो- कांट्रिब्युशन आणि ग्रोथ यांचा सहसंबंध अशा अनेक विषयावर मुद्देसुद तर्कशुद्ध आणि सुगम शैलीत केलेल्या निरूपणाने डॉ. खानझोडे यांनी उपस्थितांची मने जिंकली.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. दिलीप अलोणे यांनी बाहेरून आलेल्या लोकांच्या गुणवत्तेला स्वीकारत त्यांना मोठे करण्याच्या वणीच्या स्वभावाचे वैशिष्ट्य वर्णन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन राजाभाऊ पाथ्रडरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मेगावार, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे यांनी विशेष परिश्रम घेतले.