Home Breaking News नजरकैदेतील ‘राजू’ च्या भेटीला भाजपा पदाधिकारी..!

नजरकैदेतील ‘राजू’ च्या भेटीला भाजपा पदाधिकारी..!

1611

मनसे व भाजपात वाढतेय जवळीक

वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाला 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिल्याने वातावरण तापलं आहे. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले तर राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना त्यांच्याच निवासस्थानी नजरकैदेत ठेवताच भाजपा पदाधिकाऱ्याने घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरताहेत.

मनसेच्या नेत्यांनी समकक्ष भूमिका घेतल्याने भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटताहेत. त्यातच नजरकैदेतील ‘राज’ च्या भेटीला भाजपा पदाधिकारी रवी बेलूरकर पोहचल्याने स्थानिक पातळीवर मनसे व भाजपात जवळीक निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहे. मात्र ‘लाव रे तो व्हिडीओ’ या डायलॉग चा स्मृतिभ्रंश होणे गरजेचे आहे.

राजकारणात कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र कोणीच नसतो. सत्तास्वार्था करिता पक्षाच्या अजेंड्या प्रमाणे वैचारिक भूमिका हाताळणाऱ्याला कवच-कुंडले प्रदान करण्यात येते याचे वास्तव मागील काही दिवसात राज्यात घडलेल्या घडामोडीवरून सिद्ध होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करायची असेल तर ‘ठाकरे’ यांच्यासोबतच जवळीक साधावी लागणार आहे. मागील निवडणुकीत भाजपाने अनेक लहान पक्षाला सामावून घेतले होते. त्यात महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्या राजकीय पक्षांचा समावेश होता सध्यस्थीतीत ही नावे लोप पावली आहेत.

भाजपला स्वपक्षीय अजेंड्याप्रमाणे ‘हिंदुत्ववादी’ कणखर भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रादेशिक पक्ष बळ देणारा ठरेल त्यातच राज्यातील सत्ताधारी शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणारा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकामध्ये मनसेची साथ-संगत मोलाची ठरणार असल्याने भाजपा व मनसेचे सूत जुळेल का हे सांगण्यासाठी भविष्यवेत्याची गरज नाही.

वणी विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बऱ्यापैकी ताकद आहे. त्यांची संगठणबांधणी मजबूत आहे त्यातच युवकांची फळी आणि आक्रमक भूमिका यामुळे स्थानिक पातळीवर भाजपाला कितपत फायदा होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. तर भाजपाची वाढलेली जवळीक, पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेले असताना तडकाफडकी जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर यांनी घेतलेली भेट राजकीय स्वरूपाची समजायची की बालपणी पासून असलेल्या मैत्रीखातर हे ठरवणे अवघड झाले आहे.
वणी: बातमीदार