Home Breaking News लेफ्टनंट कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर शुक्रवारी होणार ‘अंत्यसंस्कार’

लेफ्टनंट कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर शुक्रवारी होणार ‘अंत्यसंस्कार’

1316
वणीकरांना आज सायंकाळी घेता येईल अंत्यदर्शन

वणी: तालुक्यातील मुर्धोनी येथील मूळ निवासी लेफ्टनंट कर्नल वासूदेव दामोदर आवारी (35) हे अरुणाचल प्रदेश येथील भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारार्थ हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचेवर मुर्धोनी येथे शुक्रवार दि.7 ऑक्टोबर ला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

शहीद लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या अंत्यसंस्काराला खा. बाळू धानोरकर, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार निखिल धुळधर, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार, ठाणेदार रामकृष्ण महल्ले व इतर गणमान्य नागरिक उपस्थित राहणार आहे.

लेफ्टनंट कर्नल वासूदेव दामोदर आवारी हे 170 फिल्ड रेजिमेंट (वीर राजपूर) मध्ये कर्तव्यावर होते. नुकतेच त्यांना मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती मिळाली होती. त्यांचे शालेय शिक्षण येथील विवेकानंद विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी NDA येथे प्रवेश घेतला. त्यानंतर ते आर्मीत मेजर या पदावर रूजू झाले होते.

अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर समुद्रसपाटी पासून 16 हजार फूट उंचीवर मंगळवार दि.4 ऑक्टोबर ला कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ गुवाहाटीतील मिलीट्री बेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देशसेवा करत असलेल्या सुपुत्राचे अनपेक्षितपणे झालेले निधन मनाला चटका लावणारे आहे. मुर्धोनी गावातील ग्रामस्थांसोबतच वणीकरांना शोकसागरात बुडावणारी ही घटना आहे. लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव गुवाहाटी वरून विमानाने नागपूर विमानतळावर दुपारी 4:30 वाजता पोहचणार आहे. त्यानंतर लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव रात्री वणी येथे येणार आहे. येथील स्टेट बँक समोरील त्यांच्या निवासस्थानी वणीकरांना अंत्यदर्शन घेता येणार आहे.
वणी: बातमीदार