Home Breaking News आणि…. तो मृतदेह थेट ठाण्यात नेला, पत्नीची तक्रार, चौघांवर गुन्हा नोंदवला

आणि…. तो मृतदेह थेट ठाण्यात नेला, पत्नीची तक्रार, चौघांवर गुन्हा नोंदवला

1407
Img 20250630 wa0035

अपमानित झाल्याने घेतला विषाचा घोट

वणी : स्वतःचेच उसनवारीने दिलेले पैसे मागणाऱ्या 54 वर्षीय व्यक्तीला मारहाण करण्यात आली. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात आली. यामुळे व्यथित व अपमानित झालेल्या व्यक्तीने विषाचा घोट पोटात रिचवला. ही घटना मारेगाव तालुक्यातील टाकळखेडा येथे घडली होती. तब्बल 15 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या व्यक्तीची अखेर प्राणज्योत मालवली. संतप्त नातेवाईकांनी तो मृतदेह थेट ठाण्यात नेला, पत्नीने तक्रार देताच चौघांवर गुन्हा नोंदवला आहे.

Img 20250630 wa0037

नानाजी देवराव धानकी (54) असे दुर्दैवी मृतकाचे नाव असून ते टाकळखेडा येथील निवासी होते. त्यांनी शेजारी वास्तव्यास असलेल्या विलास रामचंद्र धानकी याला आठ दिवसाकरिता 50 हजार रुपये हातउसने दिले होते. मात्र उसनवारीने दिलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ करत होता.

Img 20250103 Wa0009

नानाजी यांना पैशाची तीव्र निकड असल्याने ते 22 मे ला शेजारी राहणाऱ्या विलास यांच्या घरी गेले व उसनवारीने दिलेल्या रकमेची मागणी केली. यावेळी पैसे देत नाही असे स्पष्ट करत विलास रामचंद्र धानकी, पत्नी चंद्रकला विलास धानकी, मुलगा मयूर विलास धानकी व विठ्ठल रांगणकर रा.मारेगाव यांनी नानाजीला मारहाण केली आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.

घडलेल्या प्रकाराने व्यथित झालेल्या नानाजी यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 15 दिवस मृत्यूशी झुंज देत रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

नानाजीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट मारेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पत्नी सुभद्रा धानकी यांच्या तक्रारीवरून विलास, पत्नी चंद्रकला, मुलगा मयूर रा.टाकळखेडा याच्यासह विठ्ठल रांगणकर रा. मारेगाव या विद्याविरुद्ध भादवि 306, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वणी: बातमीदार