Home Breaking News अरेच्चा… तोबा गर्दी, रस्ते जाम आणि प्रशासन ‘निर्जीव’

अरेच्चा… तोबा गर्दी, रस्ते जाम आणि प्रशासन ‘निर्जीव’

679

विठ्ठलवाडीतील नागरिक हैराण

लग्न सराई चे दिवस आहेत, लॉन आणि मंगल कार्यालय आपले इस्पित साध्य करताहेत. मंगळवार दि. 7 डिसेंबर ला विठ्ठलवाडी परिसरातील लॉन आणि मंगल कार्यालयात सायंकाळी मंगल सोहळा होता. त्या ठिकाणी वाहनतळ नसल्याने रस्त्यावरच तोबा गर्दी उसळली होती, वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त तर प्रशासन निर्जीव असल्याचा प्रत्यय आला.

कोरोनाचा वाढता उपद्व्याप बघता मंगल कार्यालयांना काही नियम आहेत की नाही असा संभ्रम निर्माण होत आहे. मागील महिन्यात 4 तर या महिन्यात 1 कोरोना बाधित शहरात आढळले आहेत. आणि बहुतांश याच परिसरातील असल्याने नागरिक सावध असले तरी हे व्यवसायिक असे का वागतात हा प्रश्न उपस्थित होत आहे.

विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या बहुतेक लॉन व मंगल कार्यालयात वाहनतळ सुविधा नाही. रस्त्यावर वाहने ठेवण्यात येतात, याला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असले तरी वाहतूक व्यवस्था सांभाळण्याचे काम पोलीस प्रशासनाला करावे लागते.

वरोरा मार्गावरील या मंगल कार्यालयात होणाऱ्या समारंभात रस्त्यावर वाहने पार्क केली जात असेल आणि यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत असेल किंवा स्थानिकांना नाहक त्रास होत असेल तर त्या मंगल कार्यालय मालकांना तंबी देण्याचे धारिष्ट्य पोलीस प्रशासन दाखवेल का ?

जिल्हाधिकारी यांनी कोविड त्रिसूत्री बाबत नियमावली पारित केली आहे. याचे पालन संबंधित आस्थापना करताहेत का? यावर कोण प्रतिबंध घालणार याकडे विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून हजारो नागरिक सोहळ्यात सामील होत असल्याने पुढील काळ स्थानिकांना कोरोनाच्या सानिध्यात घालावा लागेल हे निश्चित.
वणी: बातमीदार