Home Breaking News आणि…स्वतः ठाणेदारांनीच गाठला मटका अड्डा

आणि…स्वतः ठाणेदारांनीच गाठला मटका अड्डा

1195

मटका खेळल्याजात असल्याची होती कुणकुण

वणी: शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात मटका अड्डा चालविण्यात येत असल्याची माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळाली. गुरुवार दि. 20 जानेवारीला दुपारी 3:45 वाजताच्या दरम्यान स्वतः ठाणेदारांनी साध्या वेशात दुचाकीने जाऊन धाड टाकली. यावेळी दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अब्दुल हाफीज उर्फ टापु अब्दुल सत्तार (40) रा. मोमीनपुरा वणी व अब्दुल रज्जाक शेख मुख्तार (35) रा मुकूटबन ता.झरी असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. त्यांचे जवळून 15 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अवैद्य व्यवसायिकांच्या मुसक्या अवळण्या करिता ठाणेदारांनी डीबी पथक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अनेकदा धाडसत्र अवलंबले. मात्र शहरातील काही अवैद्य व्यावसायिक जुमानताना दिसत नाही. पोलिसावरच पाळत ठेऊन आपले मनसुबे पूर्णत्वास नेताहेत.

जुन्या बस स्थानक परिसरातील एका गल्लीत दररोज जत्रेचे स्वरूप येत असते. मटका व्यावसायिक व खेळणाऱ्यांची चांगलीच ‘चेंगड’ सुरू असते. पोलिसांनी अनेकदा कारवाया केलेल्या असताना येथील अवैद्य धंदा मात्र बंद होतांना दिसत नाही.

ठाणेदारांनी स्वतः त्या गल्लीत पाहणी केली आणि पो.उप.नि. शिवाजी टिपुर्णे, सुदर्शन वानोळे व पोलीस पथकाला तात्काळ आदेशीत करत धाड टाकली असता एकच धावपळ उडाली. दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, SDPO संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो. नि. श्याम सोनटक्के, डी.बी. पथक पोउपनि शिवाजी टिपुर्णे, सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, हरीन्द्रकुमार भारती, विशाल गेडाम, अमोल नुनेलवार यांनी केली गुन्हयाचा पुढील तपास सुदर्शन वानोळे पो.स्टे. वणी हे करीत आहे.
वणी: बातमीदार