Home वणी परिसर गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संगीत मैफिल

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संगीत मैफिल

167

वणी बातमीदार: 

जैताई देवस्थान व संस्कार भारती समिती द्वारे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले. संस्कार भारती समितीच्या वतीने  गुरुपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर शास्त्रीय संगीतावर मैफिल रंगली.

संगीत मैफिलीच्या आयोजनामागील भूमिका संस्कार भारतीचे वणी नगर कार्यवाह सागर मुने यांनी मांडली. आयोजक संस्था जैताई मंदिराचे कार्यवाह माधव सरपटवार यांनी या प्रसंगी गुरुपौर्णिमा व आषाढी एकादशीचे महत्व विशद करून नंतर दर महिन्याला जैताई मंदिर व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत सभेचे आयोजन करून या परिसरातील नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या प्रसंगी संस्कार भारतीचा माजी अध्यक्ष रजनी पोयाम यांनी गजानन कासावार यांची गुरू पौर्णिमेनिमित्त पूजन करून गुरुदक्षिणा दिली.

आषाढी एकादशी निमित्त झालेल्या या संगीत मैफिलीत गायक राकेश वाहदूळे, अरुण दिवे, त्रिम्बक जाधव यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगावर दर्जेदार अभंग सादर केले. साथसंगत पखवाज अभिलाष राजूरकर, तबला वादक अमोल बावणे, सहताल वाद्य अक्षय करसे, तानपुरा वादन वेदिका शेंडे यांनी केली.