Home वणी परिसर त्या..खड्डयात बसून करणार आंदोलन

त्या..खड्डयात बसून करणार आंदोलन

143

अपघाताची शक्यता, नागरिक संतप्त

वणी बातमीदार:  वणी-गणेशपूर ला जोडणाऱ्या निर्गुडा नदीवरील पुलावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. अपघाताची शक्यता बळावली असून नागरिकांना अतोनात मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ 2 दिवसात खड्डये बुजवावे अन्यथा खड्डयात बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा छत्रपती महोत्सव समिती ने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनातून दिला आहे.

वणी तालुक्यातील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डयांची शृंखला निर्माण झाली आहे. चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. लहानसहान अपघात नित्याचेच असून मोठया अपघाताची शक्यता बळावली आहे. परंतु संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत असून नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्यापूर्वी डागडुजी करावी अशी मागणी होत आहे.

गणेशपूर येथील छत्रपती महोत्सव समिती ने बांधकाम विभागाला 2 दिवसाचा अवधी दिला असून ते खड्डे दुरुस्त न केल्यास त्याच खड्डयात बसून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी गणेश काकडे, विवेक ठाकरे, गजानन चांदावार, आशिष बोबडे, प्रवीण खानझोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.