डॉ. सुनंदा आस्वले यांचे प्रतिपादन
वणी बातमीदार: लोकमान्य टिळक महाविद्यालयात आभासी पद्धतीने लोकमान्य स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.सुनंदा आस्वले यांनी आपले विचार व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आपण आपल्या नवीन शैक्षणिक धोरणात ज्या गोष्टीवर भर देत आहोत, त्या गोष्टींचा विचार सव्वाशे ते दीडशे वर्षापूर्वी लोकमान्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणलेला होता. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने द्रष्टे शिक्षणतज्ञ होते असे प्रतिपादन केले.
राष्ट्रीय शिक्षणाद्वारे देशप्रेमाने भारावलेले, विद्याव्यासंगी आणि समाजोन्मुख विद्यार्थी निर्माण करणे हे शिक्षणाचे ध्येय असायला हवे. धर्म आणि नीती च्या आधारावर नवनवीन विद्या आणि नवनवीन कौशल्य नियुक्त असणारा विद्यार्थीच राष्ट्राच्या निर्मितीचा आधारस्तंभ असू शकतो. असे डॉ. आस्वले म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तावि प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले तर ऍड. लक्ष्मण भेदी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. आज आपण वापरत असलेल्या प्रिपरेटरी क्लास, रेमेडियल कोर्स या संकल्पना सव्वाशे वर्षापूर्वी त्यांनी प्रत्यक्षात कशा आचरणात आणल्या हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. “हे आमचे गुरु नाहीत” या तीन लेखांमधून पारतंत्र्याला पोषक असणारी शिक्षणपद्धती नसावी. भारतीय गुरुकुल पद्धतीनुसार एतद्देशीय संस्कार देणारी शिक्षण पद्धती त्यांना कशी अपेक्षित होती? ते सांगत लोकमान्यांच्या विचारांची आजच्या काळातही असणारी सुसंगतता अधोरेखित केली.
अध्यक्षीय समारोपात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला यांनी कोविडच्या या बंधन काळात आभासी पद्धतीने व्याख्यानमाला अखंड ठेवल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करीत महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. या व्याख्यानाची तांत्रिक बाजू गुलशन कुथे, महादेव भुजाडे आणि जयंत त्रिवेदी यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे तर आभार प्रदर्शन सहसचिव अशोक सोनटक्के यांनी केले.