ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे प्रतिपादन
वणी बातमीदार: राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे बेहाल झाले. कित्येकांचे आर्थिक बजेट बिघडले अशा परिस्थितीत सहकार खात्यानेच राज्याला तारले.असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले.ते येथील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंधराव्या शाखेच्या उदघाटन प्रसंगी केले.
शहरात अल्प काळात नामवंत सहकारी संस्था म्हणून रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था उदयास आली आहे. या संस्थेच्या पंधराव्या शाखेचा उदघाटन सोहळा शेवाळकर परिसरातील नवीनतम इमारतीत करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक ऊर्जा मंत्री नितीन राऊत तर खासदार बाळू धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार हे होते.
व्यासपीठावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, टिकाराम कोंगरे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राजुदास जाधव, संजय देरकर, वसंतराव घुईखेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्वागतोत्सुक म्हणून रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे हे उपस्थित होते.
श्री. रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या पंधराव्या शाखेचे उदघाटक ऊर्जा मंत्री नितीन राऊत उपस्थितांना संबोधित करीत होते. त्याचवेळी लगतच असलेल्या मुस्लिम समाज बांधवांच्या प्रार्थनास्थळातून असर च्या नमाजची अजान सुरू झाली. लगेचच राऊत यांनी आपले भाषण थांबवून अजान ला व्यत्यय येवू नये याची काळजी घेतली. अजान संपताच त्यांनी पुन्हा आपले संबोधन सुरु केले. त्यांच्या या आदरार्थी कृत्याची वाहवा होत आहे.
पुढे बोलताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले की, या परिसरात सहकार क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्था उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर खासदार बाळू धानोरकर यांनी जी संस्था पूर्वीं किरायावर केवळ दहा बाय दहाच्या खोलीत स्थापित झाली.त्या संस्थेच्या वटवृक्षा प्रमाणे फांद्या वाढल्या आहे. शेतकरी, शेतमजूर अशा तळागाळातील गरजूंना अर्थसाहाय्य करण्याचे काम रंगनाथ स्वामी पतसंस्था करीत असल्याचे मत व्यक्त केले. संचालन संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, तर मुख्य कार्यकारी अधिकारी मेघश्याम तांबेकर यांनी आभार मानले.