Home क्राईम चक्क…बसस्थानकावर लुटले, आरोपी जेरबंद

चक्क…बसस्थानकावर लुटले, आरोपी जेरबंद

373

वणी पोलिसांची कारवाई

वणी बातमीदार:- वणी बसस्थानकावर सोमवारी रात्री 11.35 वाजता दुचाकीने आलेल्या दोन भामट्यानी गावी जाण्यासाठी थांबलेल्या दोघांना लुटल्याची घटना घडली. याबाबत वणी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांचे जवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सागर उर्फ गोलू मोहन पुसाटे (25) रा. वणी व अनिकेत दादाराव कुमरे (19) रा. सिंधी मारेगाव अशी ताब्यातील आरोपींची नावे आहेत. सोमवारी रात्री रामदास बापुराव वाभिटकर (41)रा. कोरपना जिल्हा चंद्रपूर हे यवतमाळ वरून बसने रात्री वणीला आले. तसेच संतोष दौलत पोफरे रा. कोलगांव ता. मारेगांव यांचे सोबत बस स्थानकावर गावी जाण्याकरिता बस नसल्याने उभे होते. गावी कसे जावे या विवंचनेत असतानाच दुचाकीवर आलेल्या भामट्याने पोफरे यांना पकडले व दोघांच्या खिश्याची चाचपणी केली. यावेळी वाभिटकर यांचे जवळून 1 हजार 100 रुपये काढून घेत पोबारा केला.

अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे दोघेही घाबरले त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून घडलेली हकीकत कथन केली. ठाणेदार वैभव जाधव यांनी क्षणाचा विलंब न लावता रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या सपोनि आनंद पिंगळे यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरोरा रोड परिसरात दोन इसम मो.सा ने फिरत असताना दिसून आले. पोलीसाची चाहुल लागल्याने ते पळुन जात असतांना त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी त्यांचे जवळून दुचाकी व रोख रक्कम असा एकूण 11 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी च्या विरुद्ध भादवि कलम 392, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलोस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, सपोनि आनंद पिंगळे, वसीम शेख, चालक सुरेश किन्नाके यांनी केली.