Home वणी परिसर त्या..पाच वर्षातील विकासकामात लाखोचा ‘भ्रष्टाचार’

त्या..पाच वर्षातील विकासकामात लाखोचा ‘भ्रष्टाचार’

395

*ग्रामपंचायत प्रशासन, वरीष्ठ अधिकारी, सचिव आणि ठेकेदार जबाबदार..!

* वीस दिवसाचा अल्टीमेटम अन्यथा आमरण उपोषण

वणी बातमीदार:- मारेगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत वरुड-सालेभट्टी अंतर्गत असलेल्या सालेभट्टी व वरुड या दोन्ही गावात मागील पाच वर्षामध्ये विविध विकास कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला. याला सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन, वरीष्ठ अधिकारी, सचिव आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप निवेदनातून ग्रामस्थांनी केल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

मौजा गट ग्रामपंचायत वरुड सालेभट्टी ही ग्राम पंचायत आदिवासी बहुल क्षेत्रात मोडणारी गट ग्रामपंचायत आहे. वरुड-सालेभट्टी व वरुड-तांडा अशा वेगवेगळ्या गाववस्त्यांनी मिळून निर्माण झालेल्या या गट ग्रामपंचायतीच्या गाव विकासासाठी शासनाकडून आजपर्यंत लाखो रुपयांचा निधी आला. परन्तु 1एप्रिल 2016-17 ते 7 जुलै 2021-22 या पाच वर्षांच्या कालावधीत झालेल्या विविध विकास कामात लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गंगाधर फकरु लोणसावळे रा. सालेभट्टी यांचेसह ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी मारेगाव याना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

ग्रामविकासाच्या विविध योजनेअंतर्गत वरुड-सालेभट्टी या गटग्रामपंचायत क्षेत्रात लाखो रुपयाची विविध कामे झालीत. यात, सिमेंट नाली बांधकाम, सिमेंट रस्ता बांधकाम, स्मशानभुमी सौंदर्यीकरण व शेड बांधकाम, सार्वजनिक व व्यक्तीगत शौचालय बांधकाम यासह पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या नळयोजनेचे बांधकाम देखील करण्यात आले. मात्र झालेली सर्व कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून धातुरमातुर स्वरुपात केल्या गेली तर बरीचशी कामे ही अर्धवट स्वरुपाची असून सर्व कामाची देयके काढण्यात आल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. तर गावातील अनेक शौचालय लाभार्थ्यांचे पैसे परस्पर काढून घेतल्याचा आरोप करीत या सर्व बेजबाबदार आणि भ्रष्ट कारभाराला ग्रामपंचायत प्रशासनासह वरीष्ठ अधिकारी, सचिव आणि ठेकेदार हे प्रत्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संबंधितांवर कायदेशिर कार्यवाही व्हावी या बरोबरच अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी. या एकमुखी मागणीसाठी वीस दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे, अन्यथा आमरण उपोषणचे हत्यार उगरण्यात येणार आहे. याप्रसंगी काही विपरीत घटना वा जिवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा निवेदनातून देण्यातुन देण्यात आला आहे. निवेदनावर वरुड-सालेभट्टी येथील ग्रामस्थांनी स्वाक्षरी केल्या आहेत