Home वणी परिसर इंदिराग्राम ग्रा.पं. ला ‘पेसा’ ची हुलकावणी

इंदिराग्राम ग्रा.पं. ला ‘पेसा’ ची हुलकावणी

401

*लालफितीत अडकला प्रस्ताव

*विकासाला बसतेय खीळ

मारेगाव (बोटोणी)-राहुल आत्राम: मारेगाव तालुक्यातील शंभर टक्के अनुसूचित जमातीची लोकसंख्या असणाऱ्या इंदिराग्राम गट ग्रामपंचायत  जानेवारी 2014 मध्ये अस्तित्वात आली. ग्रा.पं. संलग्नित असलेल्या आदिवासी बहुल ग्रामपंचायतीला मात्र अद्याप ‘पेसा’ दर्जा प्राप्त झाला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीला अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायत समजली जाते आहे.

ग्रामपंचायतीचे तीन प्रभागात विभाजन करण्यात आले. तीनही प्रभागातून सात जागा अनुसूचित जमातीसाठी असून येथे अनुसूचित जमातीशिवाय कोणत्याही प्रवर्गाचे लोक राहत नाही. येथील इंदिरा ग्राम मध्ये साक्षरतेचे  70.16 टक्के तर श्रीरामपूर येथे 64.48 टक्के प्रमाण असताना या ग्रामपंचायतीचे अजून पर्यन्त ‘पेसा’ अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे इंदिराग्राम ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 असून एकूण 3 वार्ड आहे. कुटुंब संख्या इंदिराग्राम (नगारा) 160, गारगोटीपोड 50, बंदरपोड 45, श्रीरामपूर 95, धरमपोड 30, बाबईपोड 25 एकूण कुटुंब संख्या 405 आहे.

ग्रामपंचायत इंदिराग्रामद्वारा क्र./ग्रा.प.ई./5/2014  दिनांक 9 ऑक्टोबर 2014 ला उपविभागीय अधिकारी, जिल्ह्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग यांना सुध्दा पेसा अंतर्गत इंदिराग्राम श्रीरामपूर ही गावे समाविष्ट करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. ग्रामपंचायत कुंभा चे विभाजन करून इंदिराग्राम नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यासंदर्भत अधिसूचना क्रमांक व्ही.पी.एम.-2613 /प.क्र.120 /परा-4 /दिनांक 18 जानेवारी 2014 नुसार इंदिराग्राम ग्रामपंचायतीची स्थापना झाली.

इंदिराग्राम ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट इंदिराग्राम व श्रीरामपूर ही दोन महसूली गावे आहेत. इंदिराग्राम मध्ये नगरापोड, बंदरपोड, गारगोटी,समाविष्ट आहे. तसेच श्रीरामपूर मध्ये रामपुर 76 आहे तर श्रीरामपूरची लोकसंख्या 417 आहे. एकूण इंदिराग्रामची लोकसंख्या 1233 आहे. तर सन 2011-12 च्या जनगणनेनुसार इंदिराग्रामची लोकसंख्या 853 असून श्रीरामपूर ची लोकसंख्या 502 आहे. तर इंदिराग्राम ग्रामपंचायतची एकूण लोकसंख्या 1355 असून ही ग्रामपंचायत यापूर्वी कुंभा ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट असल्यामुळे ही ग्रामपंचायत पेसा मध्ये तब्बल सात वर्षाचा कालावधी लोटला तरीही समाविष्ट झाली नाही. इंदिराग्राम ग्रामपंचायत स्थापन होऊन या ठिकाणी शंभर टक्के आदिम जमात कोलाम ची कुटूंबे वास्तव्य करतात. म्हणून या ग्रामपंचायतीला पेसा मध्ये समाविष्ट करण्यात यावे. याबाबतचा ठराव सुध्दा वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आले आहे.

पूर्णतः कोलाम आदिवासी समाज असताना पेसा अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली नसल्याने गावकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. परिणामी ‘पेसा’ चा दर्जा प्राप्त होण्यासाठी हुलकावणी मिळत असल्याने हा स्थानिक प्रशासनाकरवी लालफितीत अडकला आहे. याचाच परिपाक म्हणून या बहुचर्चित ग्रामपंचायतला विकासाची खीळ बसली आहे.