*तालुका काँग्रेसचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
मारेगाव बातमीदार: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या (कॉन्हेंट) शाळा बंद होत्या. तसेच शाळेमधुन कसल्याही प्रकारचे ऑनलाईन शिक्षण विद्यार्थी घेत नव्हते. परन्तु शुल्क आकारणी बाबत संस्थाचालकांची मनमानी सातत्याने उजागर होत आहे. तरी शाळांची मनमानी थांबवावी अशी मागणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मरोती गौरकार यांनी गटशिक्षणाधिकारी यांचेकडे केली आहे.
मारेगांव तालुका हा आदिवासी बहुल तालुका व बहुतांश शेतकरीवर्ग असल्याने येथील पालक हे गरीब आहेत. ते कसेबसे मुलांना शिक्षण देत होते. कॉन्हेंट शाळेच्या प्राचार्य व अध्यक्षांनी मागील वर्षी पालकांना विश्वासात घेतलेले नाही. पालकांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीबद्दल सविस्तर माहीती देणे अभिप्रेत होते. त्याचप्रमाणे अनेक पालकांकडे मोबाईल उपलब्ध नसल्याने आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यास असमर्थ होते. तसेच शुल्क आकारणी बाबत पालकांना अवगत करणे गरजेचे होते.
पालक वर्गाची आर्थीक परीस्थीती अतिशय डबघाईस आलेली आहे. सातत्याने पडणारा दुष्काळ त्यातच कोरोनाचे सावट यामुळे अनेक पालक आपल्या पाल्याना सरकारी शाळेत शिकविण्याचा निर्णय घेताना दिसत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून शाळा सोडण्याचा दाखला मागण्याकरिता गेलेल्या पालकांची अडवणूक करण्यात येत असून संपूर्ण शुल्क भरल्याशिवाय टी. सी. देणार नाही अश्या धमक्या देत असल्याच्या तक्रारी पालकवर्गातून होत आहे. तरी 100 टक्के शुल्क माफ करुन आदिवासी बहुल तालुका व शेतकरी वर्गाना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केला आहे.