Home क्राईम आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची ‘दमछाक’

आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची ‘दमछाक’

686

*पाच दिवसापासून संशायितांची हुलकावणी

 *अर्जुनी युवकाचे हत्या प्रकरण 

मारेगाव बातमीदार : दीपक डोहणे- तालुक्यातील अर्जुनी येथील युवकाची निर्घृण हत्या करून पोबारा करणाऱ्या संशायित घटनेच्या तब्बल पाच दिवसानंतरही पोलिसांना चकमा देत आहे. दरम्यान रात्रीचा ‘दिवस’ करणाऱ्या पोलिसांची दमछाक वाढली आहे. एव्हाना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

तालुक्यातील अर्जुनी येथील  नामदेव रामपुरे यांचा थोरला मुलगा प्रमोद हा लहानपणापासून आपल्या आजोबांकडे मारेगाव तालुक्यातील खेकडवाई येथे राहत होता. येथे ऐन तारुण्यात सवंगड्याची ‘त्रिकोणी’ मैत्री झाली. कुठल्याही प्रसंगात व सुखदु:खात मिळून राहण्याचा मोह त्यांना आवरत नव्हता. असाच एक आनंद द्विगुणित करतांना एका हृदयस्पर्शी पण ‘अस्पष्ट’ कारणाने वादाची ठिणगी मनात भरली. शाब्दिक खडाजंगी विकोपाला जाऊन तिघातील वाद यातील एक मित्र प्रमोद च्या जीवावर बेतल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

परिणामी प्रमोद नामदेव रामपुरे (22) याची दिनांक 4 ऑगस्ट रोजी रात्री हत्या करून त्याचा मृतदेह घोडदरा शिवारात असलेल्या शिवारात टाकून संशायित आरोपींनी दुसऱ्या दिवसाला मूळ गावातून पोबारा केला. या घटनेने तालुक्यात पुरती खळबळ उडाली असतांना पोलिसांना हवाहवासा संशायित आरोपी मागील पाच दिवसापासून गुंगारा देत आहे.मारेगावच्या पश्चिम दिशेला असलेल्या घनदाट जंगलात त्यांचा वावर मुक्तपणे सुरु असल्याची प्राथमिक माहिती साशंक स्वरूपात पुढे येत आहे. तब्बल पाच दिवसापासून संशायितांवर पोलीस प्रशासन करडी नजर ठेवून असताना माळपठारावर रात्रीचा दिवस करीत जंगल पालथे घालत आहे.मात्र, संशायितांनी वेगवेगळ्या जागेवर स्थानांतरण करीत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. संशायितांनी तूर्तास पोलिसां समोर गजाआड करण्याचे मोठे आव्हान उभे केले असले तरी हत्येमागील नेमके कारण बेड्या ठोकल्यानंतरच पुढे येईल. तूर्तास हत्येच्या प्रकरणाला मोबाईल सह प्रेमाचा रंग बेरंग झाल्याची चर्चा जोर धरत आहे.