Home वणी परिसर छोरीयातील ‘त्या’ मोबाईल टॉवर ला तीव्र विरोध

छोरीयातील ‘त्या’ मोबाईल टॉवर ला तीव्र विरोध

451

*नागरिक संतप्त, आमरण उपोषणाचा इशारा 

*अन्यथा न्यायालयात दाद मागणार

वणी बातमीदार: वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील छोरीया लेआऊट मध्ये नवीनतम मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीने नाहरकत दिल्यामुळे नागरिक संतप्त झाले असून होत असलेले बांधकाम तात्काळ थांबवावे अशी मागणी शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे. अन्यथा आमरण उपोषणासह न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.

गणेशपुर येथील छोरीया लेआऊट परिसरातील  जलतरण तलावाजवळ ग्रामपंचायतीच्या जागेवर नवीनतम मोबाईल टॉवर चे बांधकाम होत आहे. याला परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. मोबाईल टॉवरमुळे शास्त्रीय कारणासह शारीरिकदृष्ट्या विपरित परिणाम होण्याची भीती स्थनिकाना सतावत आहे. मोबाईल टॉवर मधून पसरणाऱ्या रेडिएशनमुळे विविध आजाराला आपसूकच आमंत्रण मिळणार असल्याचा आरोप नागरिकांनी निवेदनातून केला आहे.

गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील छोरीया लेआऊट परिसरात नवीनतम मोबाईल टॉवर होत आहे. याला स्थानिकांचा प्रचंड विरोध असताना ग्रामपंचायतीने परवानगी दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाने कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार आहोत.

रवी देठे, विवेक ठाकरे

स्थानिक सामाजीक कार्यकर्ते छोरीया लेआऊट, वणी

गणेशपूर ग्रामपंचायतीने मोबाईल टॉवर व्हावे याकरिता सादर केलेले निवेदन निव्वळ धूळफेक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यावरील स्वाक्षऱ्या मोबाईल टॉवर होत असलेल्या परिसरातील नागरिकांच्या नसल्याचा गौप्यस्फोट निवेदनातून केला आहे. सदर मोबाईल टॉवरला वाणीज्य वापरासाठी आपले कार्यालयातुन परवानगी दिली असल्यास ती परवानगी रद्द करण्यात यावी तसेच मोबाईल टॉवरला परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तरी होत असलेले मोबाईल टॉवर चे बांधकाम तातडीने थांबवावे व सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविदयालयातील शैक्षणिक सत्र बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेतांना नेटवर्क मिळत नसल्याची बाब स्थानिकांनीच व्यक्त केली आहे. यामुळेच ग्रामपंचायतीने जाहीरनामा काढून ग्रामपंचायतीच्या मालकी जागेवर सुमित डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यांना टॉवर उभारणी करीता ना हरकत दिले. तत्पूर्वी 15 दिवसाच्या कालावधीत कोणाचेही आक्षेप वा हरकती प्राप्त झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये या दृष्टीने तसेच नागरीकांना ऑनलाईन नेटवर्क सेवा मिळाव्यात याकरिता प्रमाणपत्र दिले.

तेजराज आनंदराव बोढे 

सरपंच, ग्रामपंचायत गणेशपुर ता. वणी जि. यवतमाळ