* शेकडो शेतकरी सहभागी,
* म.रा.किसान सभा व आयटकचा पुढाकार
वणी बातमीदार: भाकप प्रणित महाराष्ट्र राज्य किसान सभा व आयटकच्या वतीने 9 ऑगस्ट ला क्रांतीदिनी येथील तहसील कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या विरोधात महाधरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी शेकडो शेतकरी, शेतमजूर, कामगार उपस्थित होते.
केंद्र शासनाने संसदेत तीन कृषी कायदे पारित केलेत. यामुळे शेतीव्यवस्थेवर व्यापाऱ्यांची अधिसत्ता कायम होणार आहे. शेती, अन्नधान्य व सरकारी खरेदी धोक्यात येणार आहे. त्या काळ्या कृषी कायद्या विरोधात मागील 8 महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आंदोलन करताहेत. यामध्ये जवळपास 500 शेतकरी शाहिद झाले असून केंद्र शासन त्याच शेतकऱ्यांना दहशतवादी, नक्षलवादी संबोधत आहे. याच बाबीचा निषेध म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशपातळीवर क्रांती दिनी 9 ऑगस्ट ला धरणे आंदोलन व निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर भाकप प्रणित महाराष्ट्र राज्य किसान सभा व आयटकच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते अनिल घाटे, प्रा.धनंजय आंबटकर, शंकर केमेकार, बंडु गोलर, प्रमोद पहुरकर, सुधाकर तुरानकर, मोतीलाल चिरखारे, सुनिता कुंभारे, लता रामटेके, सुकेशनी खापडेॆ यांनी केले. यावेळी शेकडो शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्ते उपस्थित होते.