Home सामाजिक वणीतील “भोलेश्वर” निष्णात ‘सर्पमित्र’

वणीतील “भोलेश्वर” निष्णात ‘सर्पमित्र’

309
Img 20240930 Wa0028

*नागपंचमी विशेष….

*शेकडो सापांना दिले जीवनदान

वणी बातमीदार: लहानपणी भीतीयुक्त कुतूहल आणि तारुण्यात जडलाय छंद. साप विषारी असो की बिनविषारी अतिशय सराईतपणे पकडण्याचे धाडस अंगीकारावे लागते. प्रभारी आरोग्य निरीक्षक पदावर नगर पालिकेत कार्यरत असलेले भोलेश्वर ताराचंद हे मागील 17 वर्षांपासून निष्णात ‘सर्पमित्र’ आहेत. आज पर्यंत त्यांनी शेकडो सापांना जीवनदान दिले आहे.

येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात शिकत असताना यवतमाळ जवळील निळोना धरण परिसरात कॅम्प गेला होता. जंगलात काही दिवस वास्तव्य होते, सतत निघणाऱ्या सापांना बघून विद्यार्थ्यांना भीती वाटत होती. परंतु त्याच सापांना योग्यरित्या पकडून जीवनदान देता येईल का असा प्रश्न पडला. काही दिवस विविध जातीच्या सापांची माहिती संकलित केली. विषारी व बिनविषारी सापांच्या जाती प्रजातीवर मंथन केले आणि सापांना पकडून योग्यस्थळी त्यांची रवानगी करण्यासाठी सारसावल्याचे भोलेश्वर यांनी सांगितले.

भोलेश्वर ताराचंद यांना महाविद्यालयात जडलेला छंद अविरतपणे आजही सुरू आहे. एका हाकेवर ते विहित स्थळी विनाविलंब पोहचतात. सापांना पकडून वणी लगत असलेल्या केसुरलीच्या जंगलात सोडण्यात येते. याकरिता त्यांनी तत्कालीन वनाधिकारी यांचेकडून रीतसर परवानगी घेतली आहे. साप हा अतिशय सुंदर सरपटणारा जीव असून शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे ते सांगतात. आपल्या परिसरात आढळणारे विषारी साप रसल वायफर (परड), कोब्रा(गवाऱ्या), मणियार, फुरसे घोणस तर बिनविषारी साप मालवण, धामण, धोंड्या, तिडक्या, वेल्या असे आहेत.

साप विषारी असो की बिनविषारी सर्वसामान्य माणसाला  प्रचंड भीती वाटते. त्याला मारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो ही बाब अतिशय लाजिरवाणी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. निसर्गाची साखळी खंडित होऊ नये या करिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणूनच पूर्वजांनी नागपंचमीला नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अमलात आणली हे सत्य नाकारता येत नाही.