Home वणी परिसर ऑनलाइन वेशभूषा स्पर्धेनी जिंकली गावकऱ्यांची मने

ऑनलाइन वेशभूषा स्पर्धेनी जिंकली गावकऱ्यांची मने

692

मारेगाव : दीपक डोहणे – मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणारी जि. प. प्राथमिक शाळा किन्हाळा येथे दरवर्षी विविध शालेय तथा सहशालेय नवोपक्रम राबविले जातात. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जि. प. प्राथमिक शाळा किन्हाळा येथे ऑनलाईन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये  इयत्ता 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

वेशभूषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी कोरोना व लसीकरण, पर्यावरण रक्षण, लेक वाचवा लेक शिकवा असे जनजागृती संदेश  तसेच शेतकऱ्याची व्यथा, महापुरुष, स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक यांचे विचार व कार्य विद्यार्थ्यांनी आपल्या वेशभूषा सादरीकरणातून मांडले. विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य, नेमकेपणा, सामाजिक संदेश व ऑनलाईन सादरीकरण हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.

सर्वत्र कोरोना सदृश परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळाले तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी वाटचाल करू शकतात. अनेक अडथळ्यांना पार करून या शाळेत सुरू असलेले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न कौतुकास्पद आहे.

कार्यक्रमाचे उदघाटक प्रदीप रामटेके (वि. अ.) पं स मारेगाव ,  अध्यक्ष विष्णुदास आडे (अध्यक्ष शा. व्य. स. किन्हाळा) तर प्रमुख पाहुणे म्हणून शुभम भोयर (सरपंच किन्हाळा) निलेश आत्राम  व निलिमा पाटील ( बी. आर. सी. साधनव्यक्ती मारेगाव) हे होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून समता मेश्राम व घुमणार (बी. आर. सी. ) यांनी काम पाहिले.

पालकांचा उदंड प्रतिसाद, मुख्याध्यापिका स्मिता देशभ्रतार व स. शिक्षिका चित्रा डाहाके यांनी शिस्तबद्ध केलेले आयोजन यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. रोहन आडे, इशाना कातवटे, वंश देठे, भाग्यश्री आसेकर, पलक सिडाम, अर्जुन भोयर, नक्ष सोमटकर, आदीश भोयर, कार्तिक मडावी, तनुष्का काकडे, ओम सोमटकर, मानसी मडावी, गणेश शास्त्रकार या विद्यार्थ्यांचे सादरीकरण विशेष कौतुकास्पद होते. सर्व गावकऱ्यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.