कुंभा (मारेगाव): बंडू डुकरे- पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाची शेतकरी चातकासारखी वाट पाहत होते. खाली माना टाकलेल्या पिकांना जगवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत होती. काल आलेल्या मुसळधार पावसाने पिकाला नव संजीवनी प्राप्त झाली आहे तर पाऊस आल्याने शेतकरी प्रफुल्लित झाला आहे.
खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस आला. शेतकऱ्यांची पिके डोलायला लागली होती. निंदन-खुरपण योग्यरीत्या होत असतानाच मागील 15 दिवसापासून पावसाने उसंत घेतली. जमीन कडक येऊन डवरणी व खुरपणी ची कामे थांबलीत. यामुळे मजुरांच्या हाताला काम सुद्धा मिळेनासे झाले होते. सोयाबीन व कापूस, फुलावर व फळधारणा अवस्थेत असल्याने पावसाची नितांत गरज होती आणि दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली तर बळीराजा प्रफुल्लित झाला आहे.