Home वणी परिसर आज संस्कृतला जागतिक सन्मान – तुषार अतकारे

आज संस्कृतला जागतिक सन्मान – तुषार अतकारे

152

वणी बातमीदार: “संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी भारत सरकारने इ.स. 1969 साली  संस्कृत दिनाची घोषणा केली. तेव्हापासून संस्कृत सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे. जगातील अनेक देशात संस्कृत दिन साजरा केल्या जातो.  संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. या भाषेला आद्य भाषा म्हणून सुद्धा ओळखले जाते. आज पूर्ण जगाला संस्कृत भाषेचे महत्व पटलेले आहे. त्यामुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये संस्कृत भाषा शिकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वणी सारख्या आदिवासीबहुल भागात या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसाराचे संस्कृत भारती च्या द्वारे चालणारी काम अत्यंत महत्त्वाचे आणि स्तुत्य आहे.” असे मत वणी येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा दैनिक सकाळचे वृत्त प्रतिनिधी तुषार अतकारे यांनी व्यक्त केले.

संस्कृत भारती लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि आदर्श प्रशासकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी संस्कृत सप्ताहात ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत होते. आज दुसऱ्या दिवशीच्या सादरीकरणात राधा मनोज ढुमे आणि रेवा विक्रम भागवत यांनी पश्य पश्य रे आकाशे या गाण्यावर नृत्य सादर केले. अमिता गंजीवार यांनी शिवमानसपूजा सादर केली तर राजुला पाथ्रटकर हिने मम प्रिय: खग: मयूर: हा निबंध सादर केला.

आदर्श प्रशासकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी जोशी हिने भगवत गीतेचा बारावा अध्याय तर अर्जुन देशपांडे याने भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सादर केला. पृथा प्रसन्न जोशी हिने संकटनाशन स्तोत्र तर बुटीबोरी येथील माहेश्वरी लेवडे हिने महिषासुरमर्दिनि स्तोत्र सादर केले. लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल जयप्रकाश लोहे हिने संस्कृतचे महाकवी जयदेव यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

आभासी पद्धतीने सुरू असलेल्या या संस्कृत सप्ताहाला वणीकर संस्कृत प्रेमी जनतेचा सुंदर प्रतिसाद प्राप्त होत आहे हे विशेष उल्लेखनीय.