* पक्ष बांधणीचे उद्धिष्ट, दोघांचा प्रवेश
वणी बातमीदार: वंचित बहुजन आघाडी पालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. पक्ष बांधणीचे उद्धिष्ट समोर ठेऊन पक्षाचे पदाधिकारी मार्गक्रमण करताहेत. दि.21 ऑगस्ट ला श्री नगाजी महाराज देवस्थान सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह ‘वंचित’ मध्ये प्रवेश केला.
विठलवाडीतील सामाजिक कार्यकर्ते किशोर चांदेकर व खरबडा मोहल्यातील जेष्ठ कार्यकर्ते अब्दुल गणी यांनी आपल्या समर्थकांसह तालुकाअध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात व जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांचे अध्यक्षतेखाली व जेष्ठ नेते मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी देखील भक्कम पणे आपले उमेदवार पूर्ण ताकतीने रिंगणात उतरविणार असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले. यावेळी जेष्ठ नेते मिलिंद पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर तेलंग यांनी किशोर मुन यांची प्रभारी शहराध्यक्ष तर प्रा. आनंद वेले यांची शहर महासचिव म्हणून निवड केली. तसेच शहरातील वॉर्ड निहाय बुथबांधणी करण्याचे आदेश दिले.
यावेळी तालुका उपाध्यक्ष नरेंद लोणारे, जिल्हा सल्लागार ऍड विप्लव तेलतुंबडे, अमोल लोखंडे, भारत कुमरे, जिया अहेमद, रवी कांबळे यांचेसह बैठकीला मोठयासंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.