वणी बातमीदार: आपल्या देशात संस्कृत भाषेची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. राज्यातील विद्यार्थी आणि पालक संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतू अनेक भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेचा दर्जा वाढविण्याचे स्तुत्य उपक्रम वणीतील संस्कृत भारती सातत्याने राबविण्यात आहे ज्या मुळे ‘संस्कृत’ ला निश्चितच चांगले दिवस येतील.” असे विचार दैनिक भास्कर आणि रोखठोक न्यूज पोर्टल चे संपादक सुनील पाटील यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की, संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे, ती सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू , बौद्ध, आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या 23 शासकीय राज्य भाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. व्याकरणतज्ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
संस्कृत भारती लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि आदर्श प्रशासकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी संस्कृत सप्ताहात ते संस्कृत प्रेमींसोबत हितगुज साधत होते. आज संस्कृत दिनाच्या सादरीकरणात श्रद्धा मुनगंटीवार यांनी शिवमहिम्नस्तोत्र, आभा कोंडावार ने गीतेचा बारावा अध्याय, अनुश्री सालकाडे यांनी शिवपंचाक्षरस्तोत्र, अपूर्व देशमुख याने गीतेचा पहिला अध्याय प्रसंगी ढाकरे हिने मम विद्यालय: हा निबंध, स्वरदा हस्तकने शूरा: वयं हे गीत, साक्षी जोशी हिने पिपासित:काक: ही कथा तर नागपूर निवासी नरेश पांडे यांनी संस्कृत प्रार्थना सादर केली.