Home वणी परिसर वीजपुरवठया अभावी तलाठी कार्यालये

वीजपुरवठया अभावी तलाठी कार्यालये

142

* लाईन फिटिंग झाली, मीटर कधी येणार..!

* कामासाठी येणाऱ्यांना होतोय त्रास

कुंभा(मारेगाव): बंडू डुकरे- मारेगाव तालुक्यातील खेड्यापाड्यात शेतकरी हिताकरिता शासनाने तलाठी कार्यालय बांधले आहे. शेतकरी व विविध कामासाठी येणाऱ्याना एकाच ठिकाणी दस्तऐवज मिळावा हा उद्देश होता. परंतु त्याच कार्यालयात 1 वर्षांपासून लाईन फिटिंग करण्यात आली मात्र वीज मीटरचा पत्ताच नसल्याने कामासाठी येणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

तालुक्यात ठीकठिकाणी शासनाने तलाठी कार्यालयाची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांना विविध दस्तऐवज एकाच ठिकाणी मिळावा व तालुक्याच्या ठिकाणी येरझाऱ्या माराव्या लागू नये हा उद्देश होता. मारेगाव तालुक्यातील सिंधी, बोरी (गदाजी), कुंभा 1 व कुंभा 2 येथे तलाठी कार्यालये 2 वर्षांपूर्वी बांधण्यात आले. कार्यालयातील वीज फिटिंग सुद्धा करण्यात आली आहे. परंतु वीज मीटर का लावण्यात आले नाही हे कळायला मार्ग नाही. ऑनलाइन सातबारा तर मिळणे दूर साधा सात बारा मागणी साठी आलेल्या शेतकऱ्यांना तो वेळेवर उपलब्ध होत नाही.

तलाठी कार्यालयात वीज पुरवठा नसल्याने तलाठी, कोतवाल नियमित बसताना दिसत नाही. पंखा, लाईट नसल्याने शारीरिक घाम पुसत कार्यालयात बसण्याची तसदी घेतल्या जात नाही यामुळे कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असून वीज मीटरची तात्काळ पूर्तता करावी अशी मागणी होत आहे.