Home वणी परिसर खड्डयात गेलेल्या रस्त्यासाठी खड्डयात बसून ‘उपोषण’

खड्डयात गेलेल्या रस्त्यासाठी खड्डयात बसून ‘उपोषण’

106

* अडेगाव – खडकी रस्त्यासाठी अनोखे आंदोलन

मुकूटबन बातमीदार: झरी जामनी तालुक्यातील अडेगाव-खडकी या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. ओव्हरलोड वाहतुकीने खड्डयात गेलेल्या रस्त्यासाठी खड्डयात बसून ‘उपोषण’ करण्याचा निर्णय अडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वात तरुणांनी घेतला आहे. या मार्गाचे तात्काळ काँक्रीटीकरण करावे या मागणीसह अन्य मागण्या रेटून धरण्यात आल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेला झरी-जामनी तालुका मौल्यवान गौण खनिज संपत्तीने नटलेला आहे. अडेगाव – खडकी – गणेशपुर या परिसरात मोठ्या प्रमाणात खदानी आहेत. या खदाणीतून उत्खनन झालेल्या खनिजांची वाहतूक अवजड वाहनाने करण्यात येते. यामुळे परिसरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या भारवहन क्षमतेपेक्षा सातत्याने होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याची चाळणी झाली आहे.

अडेगाव – खडकी – गणेशपुर या परिसरात जगती मिनरल्स, ईशान मिनरल्स, सूर्या मिनरल्स, गुंडावार मिनरल्स, मोनेट इस्पात व अन्य गौण खनिजाच्या खदाणी आहेत. ओव्हरलोड वाहतुकीची वर्दळ रस्त्याच्या दुर्दशेला कारणीभूत ठरते आहे. प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊनही रस्त्याची ‘अवहेलना’ थांबवता आलेली नाही. प्रशासनाचे जाणीवपूर्वक होत असलेले दुर्लक्ष स्थानिकांच्या मनात उद्रेक निर्माण करताहेत.

परिसरातील स्थानिकांच्या जनभावना लक्षात घेता, खड्डयात गेलेल्या रस्त्यासाठी खड्डयात बसून ‘उपोषण’ करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आहे. पहिल्या दिवशी खड्डयांत बसून आंदोलन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी जिल्हा अधिकारी याना रक्ताने माखलेले पत्र पाठविण्यात येणार आहे, तिसऱ्या दिवशी मुंडन तर चौथ्या दिवशी रास्तारोको करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पस्ट केले आहे. या आंदोलनात राहुल ठाकूर, दत्ता लालसरे, गिरीधर राऊत, दिनेश जीवतोडे, निखिल देठे, दत्ता भोयर सहभागी होणार असून त्यांना ग्रामस्थांची साथ लाभणार आहे.