Home Breaking News चक्क…वाघाच्या अवयवाची विक्री, तिघे अटकेत

चक्क…वाघाच्या अवयवाची विक्री, तिघे अटकेत

185

*चंद्रपूर जिल्ह्यातील तस्कर

*बुटीबोरी येथे कारवाई

चंद्रपूर: बुटीबोरी वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रविवारी रात्री बुटीबोरी परिसरात सापळा लावण्यात आला. वाघाची शिकार करून अवयव विक्रीचा गोरखधंदा करणारा आरोपी अलगद सापळ्यात अडकला. त्याचे जवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
महादेव आळकू टेकाम(50), विजय लक्ष्मण आलाम (45), रामचंद्र नागो आलाम(55) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिपरी तालुक्यातील कोठारी वनक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पाचगाव नियत क्षेत्रात वाघाची शिकार करून अवयव विक्री होत असल्याची माहिती वन विभागाच्या पथकालामिळाली होती. याप्रकरणी बुटीबोरी वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी एल. व्ही. ठोकळ यांनी पथकासह पाळत ठेवत पाचगाव येथील महादेव टेकाम याला ताब्यात घेतले.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव हे वनक्षेत्र वनहक्क दाव्या अंतर्गत वनसंवर्धन करण्यासाठी अनुसुचित जमाती प्रवर्गाला इतर पारंपरिक वननिवासी म्हणून वनसमितीला हस्तांतरण करण्यात आले. मात्र येथीलच वनसमितीचे लाभार्थी वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवाची विक्री करीत असल्याची बाब उघड झाली आहे. रविवारी रात्री टेकाम याला बुटीबोरी येथून ताब्यात घेत कसून चौकशी केली.
घटना पाचगाव व कोठारी वनक्षेत्रातील नियत क्षेत्र असल्याने तपास चक्रे या दिशेने गतीमान झाली. तपास अधिकारी एल. व्ही. ठोकळ यांच्या समवेत कोठारी चे वनक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे, राजुरा फिरते पथकाचे अधिकारी विनायक नरखेडकर व बल्लारपूर फिरते पथकाचे अधिकारी गादेवार आणि वनकर्मचारी पथकासह आरोपींच्या गावी झडती घेतली असता शिकारीचे अवजारे आढळून आले. यावेळी तीन आरोपीना ताब्यात घेण्यात आले. तर चौथा आरोपी लकव्याने ग्रस्त असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले नाही अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पुढील तपास बुटीबोरी वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी करीत आहे. वाघाच्या अवयव तस्करी प्रकरणी मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलल्या जात असून विस्तृत तपासा अंती खरे चित्र स्पष्ट होणार आहे.