Home Breaking News सण उत्सवामुळे ‘जुन्या’ ठाणेदाराचा वणीत ‘मुक्काम’..!

सण उत्सवामुळे ‘जुन्या’ ठाणेदाराचा वणीत ‘मुक्काम’..!

161

* इतिहासात पहिल्यांदाच प्रभाराला विलंब

सुनील पाटील- वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांची प्रशासकीय बदली 30 ऑगस्ट ला झाली. अवघ्या 2 किंवा 3 तासात दुसरा अधिकारी प्रभार घेतो, हा या ठाण्याचा इतिहास आहे. मात्र तीन दिवसात ‘पीएसओ’ ची निवड होऊ नये हे जिल्हा प्रशासनाचे अपयश की संभाव्य रणनीती हे कळायला मार्ग नाही. यामुळेच अगामी सण उत्सवानिमित्त जुन्या ठाणेदाराचा वणीत ‘मुक्काम’ राहणार असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

जिल्ह्याच्या पोलीस दलात खांदेपालट झाला आहे. अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय व कसुरी वरून इतरत्र  जिल्हा प्रशासनाने बदल्या केल्या आहेत. या बाबत 31 ऑगस्ट ला आदेश निर्गमित करण्यात आले असून वणी चा प्रभार मात्र देण्यात आला नाही. वणी ठाण्याकरीता अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत. परंतू जिल्हा पोलिस अधीक्षकांना जिल्यातील कायदा व सुव्यवस्था पारदर्शकपणे सांभाळायची असल्याने ‘पॉलिटिकल’ दाबावतंत्राला बळी न पडता निर्णय घ्यावा लागणार आहे.

जिल्ह्यात वणी पोलीस ठाण्याला ‘मलाईदार’ ठाणे म्हणून ओळखल्या जाते. येथे काहीकाळ वर्णी लागावी या करिता अनेक अधिकाऱ्यांना दिवसा सुद्धा ‘स्वप्न’ पडत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर डॉ. दिलीप भुजबळ पाटील रुजू होताच त्यांनी अवैध व्यवसायावर प्रथमतः लक्ष केंद्रित केले. जिल्ह्यातील सर्वच ठाणेदारांना ‘तंबी’ दिली आणि आढळल्यास तडकाफडकी उचलबांगडी सुद्धा केली आहे.

वणी परिसरात औद्योगिकीकरणामुळे आर्थिक संपन्नता निर्माण झाली आहे. याच कारणास्तव आपसूकच अवैद्य व्यवसायाला पूर्वापार चालना मिळताना दिसत आहे. कोळसा चोरी, कोंबड बाजार, भंगार चोरी, अवैद्य दारू, मटका-जुगार, गोवंश तस्करी यातील काही व्यवसाय बंद असल्याचे सार्वजनिकरित्या भासवल्या जात असले तरी ते पडद्याआड सुरू आहेत किंबहुना सुरू असल्याची वाच्यता होत नाही.

“ज्याचं नाही कोणी, त्याने जावं वणी” ही म्हण प्रचलित असली तरी वणी पोलीस ठाण्याचा प्रभार मिळविण्यासाठी ज्यांना राजकीय ‘गॉडफादर’ किंवा  वरदहस्त असेल त्यांचीच वर्णी लागल्याचे प्रकर्षाने दिसते. यापुढे नेमकी कोणाची वर्णी लागणार हा संशोधनाचा विषय असला तरी अगामी सण उत्सव लक्षात घेता सर्वाधिक कार्यकाळ गाजवणाऱ्या पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनाच ‘मुक्काम’ करावा लागेल असे चित्र निर्माण झाले आहे.