Home Breaking News पूजा करायला आला आणि दागिने घेऊन पोबारा केला

पूजा करायला आला आणि दागिने घेऊन पोबारा केला

115

* वृद्ध महिलेला गंडविले, मंदिरातील घटना

वणी :- मंदिरात पूजा करण्याचा बहाण्याने 75 वर्षीय वृद्ध महिलेला लुटले. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने मोठ्या चलाखीने लंपास करून पोबारा केल्याची घटना दि 4 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजताचे सुमारास राम मंदिरात घडली.

मुख्य बाजार पेठेत पुरातन राम मंदिर आहे. या मंदिरा समोरच अमोल वैध यांचे घर आहे. वैध यांच्या 75 वर्षीय आई सुनंदा वैध ह्या नेहमी पूजा करण्याकरिता मंदिरात जात असतात. नेहमी प्रमाणे त्या  सकाळी 9 वाजता एका अन्य महिले सोबत मंदिरात पूजा करण्याकरिता गेल्या होत्या.

पूजा करीत असतांना पांढरा वेश परिधान करून एक इसम मंदिरात आला. त्याच्या हातात पूजा करण्याचे साहित्य होते. त्याने या दोन्ही वृद्ध महिलांना माझ्या दुकानाचे उद्घाटन आहे त्यामुळे माझी पूजा तुम्हीच करून द्या असे म्हणून आपल्या जवळील पाचशे रुपयाची एक नोटा, 100 रुपयाच्या सहा नोटा पूजेचे साहित्य दिले. महिला पूजा करीत असतांना या भामट्याने  तुमच्या अंगावरील  सोन्याची देखील पूजा करण्याचा आग्रह केल्याने वृद्ध महिलेने हातातील सोन्याच्या बांगडया, सोन साखळी व अन्य दागिने असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

महिलेने पूजा करण्यासाठी दागिने काढले असता या चोरट्याने हात चलाखी केली व दागिने लंपास करून तेथून पलायन केले. काही वेळाने ही बाब वृद्ध महिलेच्या लक्षात आली. तिने घडलेली हकीकत घरी सांगितली असता रात्री उशिरा वणी पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला असून नुकतेच रुजू झालेले ठाणेदार श्याम सोनटक्के यांचे समोर गुन्हेगार शोधण्याचे आव्हान उभे आहे.