* राजू उंबरकर यांचे आवाहन
वणी- विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वर्षातून एकदा येणारा सण, सर्जा-राजाचे ऋण फेडण्याचा दिवस आणि त्यावर सुद्धा शासनाचे गंडांतर. हा चावटपणा अजिबात खपवून घेणार नाही असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला असून विदर्भातील शेतकऱ्यांनी बिनधास्त पोळा साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून उंबरकर यांनी आक्रमक पवित्रा अवलंबत शासनाच्या आदेशाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. राज्य शासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण पुढे करत सण- उत्सव साजरे करण्यावर निर्बंध लादले आहे. नुकत्याच झालेल्या “दहीहंडी” वरून सत्ताधारी व विरोधकात चांगलीच शाब्दिक खडाजंगी होताना दिसली. त्यातच शेतकऱ्यांच्या एकमेव सण-उत्सवात ‘विघ्न’ आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून पोळा, मारबत व तान्हा पोळा या सणाकरीता प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहे. पोळा हा सण साध्यापणाने साजरा करावा तसेच कोविड त्रिसूत्रीचे पालन करावे असे आदेशीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात बैलपोळा भरवण्यात येवु नये व शेतक-यांनी त्यांचे बैल सजवून घरीच पुजा करावी असे सुचविण्यात आले आहे. कोविड- 19 संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे, आदेशांचे तंतोतत पालन करण्यात येवुन कार्यक्रम घेण्यात यावेत असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
वर्षभर राबराब राबणाऱ्या सर्जा- राजाच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी विदर्भातील शेतकरी पोळा सण उत्साहात साजरा करतात. बैलांना सजविण्यात येते, बाशिंग, बेगड, झुल, नवी वेसण, पितळी तोडे, घुंगराची चाळ, कवड्यांची माळ, गुडघ्याचे गंडे, पायातले चाळ घालून बैलांचा साज शृंगार करण्यात येतो. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. हिंदूंच्या सण उत्सवानेच कोरोना विषाणूजन्य आजाराचा फैलाव होतो का? पक्षाचे भरगच्च मेळावे, जनाशीर्वाद यात्रा, मदिरालये, बाजारपेठेत कोविड त्रिसूत्रीचे पालन न करता उसळणारी गर्दी शासनाला दिसत नाही का? असा प्रतिप्रश्न उपस्थित करून उंबरकर यांनी ‘रोखठोक’ निर्णय घेत पोळा हा सण साजरा करणारच असा निर्धार करत विदर्भातील शेतकऱ्यांनी बिनधास्त पोळा साजरा करावा असे आवाहन केले आहे.