* पोलिस इर्मजन्सी सर्व्हिसचा 112 नंबर
वणी: राज्यात पोलिस इर्मजन्सी सर्व्हिसची नवीन यंत्रणा उभी करण्यात येत आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना तात्काळ सेवा पुरविण्यात येणार आहे. मदतीसाठी 112 नंबर डायल करावा लागणार असून वणी पोलिसांच्या दिमतीला 5 नवी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना पोलिस, प्रशासन, अग्निशामक दल, रुग्णवाहिका यांची मदत आता 112 या एकाच दूरध्वनी क्रमाकांवर उपलब्ध होणार आहे. याकरिता वणी पोलिसांच्या दिमतीला 2 बोलेरो चारचाकी वाहन व 3 दुचाकी देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास यापुढे वेगवेगळे नंबर डायल करावे लागणार नाहीत. या सर्व सेवांसाठी एकच क्रमांक असल्याने ही मदत जलदगतीने उपलब्ध होणार आहे.
संकटात सापडलेल्या महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 112 या हेल्पलाइन नंबर सामान्यांना फायद्याचा ठरणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या क्रमांकावर कॉल करणाऱ्या व्यक्तींचे स्थान (लोकेशन) समजू शकेल अशी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. यामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळणार आहे.