◆आकाश भेले यांना पत्नी शोक
◆तालुक्यात डेंगुचा कहर..धाकटा भाऊ ही बाधीत
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील आयशा आकाश भेले 31 वर्षीय महिलेचा डेंगू सदृश्य आजाराने नागपूर येथे उपचारादरम्यान सोमवारला मध्यरात्री मृत्यू झाला. या धक्कादायक व वेदनादायी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मनोहर भेले व माजी नगरसेवक सुरेखा भेले यांची स्नुषा असलेल्या आयशा हिच्या प्रकृतीत मागील चार दिवसा पूर्वी कमालीचा बिघाड झाला. वणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना पुढील उपचारार्थ आयशा आकाश भेले हिला नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी मध्यरात्री एक वाजताचे सुमारास तिची प्राणज्योत मावळली.
आयशा हिच्या पश्चात सम्राट नामक पाच वर्षीय मुलगा व पती आकाश आहे. दरम्यान आकाश भेले याचा धाकटा भाऊ डेंगू सदृष्य आजाराने वणी रुग्णालयात भरती आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळतेय.
परिणामी शहरा सह तालुक्यात डेंगू आजारांने डोके वर काढले असतांना अनेकांना विळखा घातला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण आहे. प्रशासना करवी ठोस उपाययोजना कडे सपशेल दुर्लक्ष होत असताना हा आजार आता जीवघेणा ठरू पाहत आहे. त्यामुळे ढिम्म प्रशासनाच्या उपाययोजना बाबत सर्वत्र रोष व्यक्त होत आहे.
दरम्यान, आयशा आकाश भेले हिचा मृतदेह मारेगाव निवासी आणण्यात आला असून तिच्यावर दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.