● कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे भोवले
वणी- वणी तालुका आरोग्य विभागातील अधिपरिचरिका, प्रसविका, लेखापाल, वाहनचालक व अन्य कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे यांची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे आर्थिक तथा मानसिक छळ करीत असल्याची तक्रार केली होती. प्रशासनाने धक्कातंत्र अवलंबत तात्काळ त्यांची उचलबांगडी केली आहे. THO चा प्रभार दोन वर्षात दुसऱ्यांदा काढल्याने त्यांची कार्यपद्धती स्पष्ट होत आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे यांची उचलबांगडी प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव ता. मारेगाव येथे करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी या रिक्त जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र कोलगाव येथील डॉ. अमित शेंडे यांना अतिरिक्त प्रभार देण्यात आला असून या बाबतचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 2 सप्टेंबरला निर्गमित केला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे करण्यात आलेल्या तक्रारीतून कर्मचाऱ्यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. अधिपरिचरिका मनीषा जेऊरकर, नेहा मिसाळ व प्रसविका मृणालिनी आवारी, विद्या घोलप व प्रीती बावणे यांनी मानसिक व आर्थिक त्रासा बाबत अवगत केले आहे. तालुका आरोग्य अधिकारी मनमानी कारभार करीत असून कार्यालयीन वेळेच्या नंतर तसेच सुट्टीच्या दिवशी सुद्धा कर्तव्यावर बोलावतात. सातत्याने अपमानास्पद वागणूक देत सेवेतून कार्यमुक्त करण्याची धमकी देत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
● रात्री बेरात्री खर्रा आणायला लावतात ●
मागील 10 वर्षापासून आरोग्य विभागात तालुका लेखापाल या पदावर कार्यरत राहुल महाजन यांनी केलेल्या तक्रारीतून ‘रोखठोक’ आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. डॉ. कांबळे हे मानसिक त्रास देत असून कोणतेही देयके अदा करण्यास मनाई करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच रात्री बेरात्री खर्रा घरी घेऊन ये असे ठणकावतात जर विरोध केला तर तू कंत्राटी आहे तुझी तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे करील अशी धमकी देत असल्याचे तक्रारीतून चव्हाट्यावर आणले आहे.