Home Breaking News थरारक….पत्नीनेच रचला ‘निलेश’ च्या हत्येचा कट

थरारक….पत्नीनेच रचला ‘निलेश’ च्या हत्येचा कट

2786

पोलीस तपासात रहस्य उलगडले

सपना’ पोलिसांच्या ताब्यात

वणी :- रासा येथील 30 वर्षीय निलेश सुधाकर चौधरी याचा मृतदेह 29 ऑगस्ट ला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाला होता. तब्बल 15 दिवसानंतर एक-एक रहस्याचा उलगडा करत पोलिसांनी आरोपींना जाळ्यात ओढले. मात्र पत्नीनेच ‘निलेश’ च्या हत्येचा कट रचल्याची बाब तपासात उघड झाल्याने शनिवार दि. 18 सप्टेंबर ला मृतकाची पत्नी ‘सपना’ ला ताब्यात घेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मृतक ‘निलेश’ चे लग्न मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे वास्तव्यास असलेल्या ‘सपना’ सोबत झाले होते. दोघांचा सुखी संसार सुरु असताना अनैतिकतेचे ग्रहण लागले. ‘निलेश’ ची पत्नी ‘सपना’ चे सूत मृतकाचा मेव्हना चंद्रशेखर दुर्गे सोबत जुळले. जवळचा नातेवाईक असल्याने त्याचा घरातील वावर कोणालाही संशयास्पद वाटत नव्हता. परंतू अनैतिक संबंधाची कुणकुण कधीतरी लागतेच आणि तसेच घडले.

मृतक ‘निलेश’ ला अनैतिक संबंधांबाबत कळताच तो प्रचंड हादरला. घटनेच्या 5 दिवसापूर्वी त्याचा पत्नी ‘सपना’ सोबत चांगलाच वाद झाला आणि तिला माहेरी नरसाळा येथे पाठवून दिले. या घडलेल्या घटनेमुळे ‘सपना’ कमालीची संतापली आणि प्रियकराच्या मदतीने निलेशचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले.

घटनेला आयाम देण्याकरिता चंद्रशेखर याने गावातीलच आशिष पिदूरकर, योगेश उघडे, गौरव दोरखंडे व एका विधी संघर्ष बालकाला आपल्या कटात सामील करून घेतले. अतिशय थंड डोक्याने हत्येची योजना आखली. घटनेच्या दिवशी निलेश ला बेशुद्ध होईपर्यंत दारू पाजण्यात आली आणि त्या चौघांनी त्याचा करकचून गळा आवळला. लगतच असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचा बनाव रचला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हत्येच्या दिशेने तपासाची रणनीती आखली. ठाणेदार शाम सोनटक्के व तपास अधिकारी आनंद पिंगळे व सहकाऱ्यांनी दि. 16 सप्टेंबर ला 4 आरोपींना ताब्यात घेतले. 2 दिवसाच्या पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी पत्नीनेच हत्येचा कट आखल्याचे उघड झाले. शनिवारी पत्नी ‘सपना’ ला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे.