● काँग्रेसने साजरा केला राष्ट्रीय बेरोजगार दिवस
वणी- पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात भाजपा च्या वतीने साजरा करण्यात येत असताना काँग्रेस पक्षाने मात्र ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा केला. लघुउद्योग आणि स्वयंरोजगाराला चालना देण्याऐवजी ‘पकोडा तलो और बेचो’ सारखे बेजबाबदार विधाने करणाऱ्या भाजपा सरकारवर काँग्रेसने घणाघाती टीका करत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
देशाला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवीत जनतेची दिशाभूल करून भाजपाने केंद्रात सत्ता स्थापन केली. केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी शासनाच्या काळात गेल्या 45 वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी देशाला पहावी लागली. आजघडीला देशातील उच्चशिक्षित युवकांचा बेरोजगारी दर हे 60 टक्क्या वर आला असल्याचा आरोप काँग्रेस च्या वतीने करण्यात आला आहे.
केंद्रातील सरकारने सण 2016 मध्ये 12 तासांपूर्वीच्या सूचनेवर सामान्यांच्या हातातील पैसे रद्द केले. स्वतःचेच पैसे परत मिळवण्यासाठी नागरिकांना रांगेत उभे केले. यादरम्यान अनेकांचे जीवही गेले, अशा धोरणहीन निर्णयामुळे देशात रोजंदारी, लघुउद्योग आणि नोकरदारांचा रोजगार हिरावला गेल्याचा आरोप करत काँग्रेसने जीएसटीचा मुद्दा उचलून धरला आहे.
वणीत काँग्रेसने कमिटीने केंद्र सरकारवर विविध आरोपांच्या फैरी झाडतांना भाजप फॉर इंडिया नव्हे, तर भाजप फॉर अदानी-अंबानी असा आरोप केला आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सरकारी कंपन्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या उद्योजकांना विकण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचे म्हटले आहे. यामुळे केवळ बेरोजगारी नाही, तर महागाई देखील केंद्र सरकारनेच वाढविल्याचा आरोप केला आहे.
केंद्र सरकाने सरकारी मालमत्ता विकून हजारो नोकरदारांना रस्त्यावर आणण्याचे काम केले आहे. मोठमोठया सरकारी कंपन्यांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करण्याऐवजी त्या बंद करण्याचं धोरण हाती घेतल्याचे तोंडसुख यावेळी वणीच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतले असून तसे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी विधान सभा युवक काँग्रेस अध्यक्ष संतोष पारखी, शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख, निलेश पनगंटीवार, अक्षय धावंजेवार, प्रमोद लोणारे, हर्षल चापडे, विक्की पनगंटीवार, देव इंगळे, अभिजीत सोनटक्के, दादा कापसे आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.