● गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना
वणी :- अनंत चतुर्दशी पासून गणेश विसर्जनाला सुरुवात होते. विसर्जन करताना नदीवर भाविक व सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची गर्दी होऊ नये, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन व्हावे याकरिता पोलीस प्रशासन कार्य करीत असून गणपती विसर्जनाकरिता मूर्ती व निर्माल्य रथ सज्ज करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. गणेश विसर्जना करीता मिरवणुकीवर बंदी लादण्यात आली असून विसर्जनाकरिता 10 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने निर्गुडा नदीच्या घाटावर निर्माल्य कलश व विसर्जन कुंड निर्माण करण्यात आले आहे.
वणी पोलीस स्टेशन हद्दीत शहरात 28 तर ग्रामीण भागात 10 सार्वजनिक मंडळाने श्री ची स्थापना केली आहे. शहरात घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या सुविधे करिता ठाणेदार शाम सोनटक्के यांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आकर्षक रथ तयार केला आहे. या रथावर पोलीस कर्मचारी सेवा देत आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळांनी गणेश विसर्जना करिता संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.