● अधिकाऱ्याशी केलेली हुज्जत पडली महागात
वणी– वीज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांनी थकीत देयकामुळे वीज मीटर खंडित केले. याचा जाब विचारण्याकरिता टोलनाका परिसरातील कार्यालयात सोमवार दि. 20 सप्टेंबर ला व्यवसायिक राज जयस्वाल गेले. त्यांनी देयकाबाबत अभियंत्यांसोबत हुज्जत केली आणि प्रकरण पोलिसात पोहचले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
कोरोनाचा कालखंड सुरू असताना वीज वितरण कंपनी आपल्याच मर्जीने कामकाज करत आहे. या काळात ग्राहकांना सोयी-सुविधा मिळाव्यात याकरिता राज्य सरकार सतर्क आहे मात्र वीज वितरण कंपनी आपलेच वर्चस्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. थकीत देयकावरून राज्यात अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.
घटनेच्या दिवशी वीज वितरण कंपनी चे अभियंता व चार कर्मचारी बन्सल लेआऊट मधील जयस्वाल यांचे घरी थकीत देयक 15 हजार 878 रुपयांच्या वसुली करिता गेले होते. घरच्या मंडळींना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला माहीत नाही, वडिलांना विचारा असे सांगितले यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
या प्रकरणी घर मालक राज जयस्वाल हे टोल नाका परिसरताल्या वीज वितरण कंपनी च्या कार्यालयात वीज देयका बाबत जाब विचारण्यास गेले असता तेथील अभियंता राजेश बालाजी जिजलवार यांचे सोबत हुज्जत झाली आणि प्रकरणाने वेगळे वळण घेतले. वीज वितरण कंपनी चे अधिकारी व कर्मचाऱ्यानी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले व व्यावसायिक राज जयस्वाल यांचेवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.
वणी पोलिसांनी शासकीय कामकाजात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असून राज जयस्वाल यांचेवर गुन्हा नोंद केला आहे. परंतू कोरोनाच्या कालखंडात कोविड त्रिसूत्रीचे पालन करताना मात्र संबंधित विभाग दिसत नाही. ही बाब प्रामुख्याने आज जाणवली, पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले वितरणचे अधिकारी व कर्मचारी बिनधास्त वावरत होते.कदाचित ते कोविड त्रिसूत्रीचे पालन करण्याचे भान विसरले असावेत.