वणी:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांचे निर्देशानुसार वणी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार २५ सप्टेंबर रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, वणी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केलेले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच दावा पूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. दावा पूर्ण प्रकरणांमध्ये ग्रामपंचायतीकडील घरपट्टी व पाणीपट्टी कर तसेच बँके कडील कर्ज वसुली प्रकरणे मोठया प्रमाणावर दाखल झालेली आहेत. आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायाधीश, वकील यांचे मंडळ आपणास मदत करेल. कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, लोकन्यायालयाच्या निवाडा विरुध्द अपील नाही. न्यायालयाच्या हुकुमनामा प्रमाणे लोकन्यायालयात होणा-या निवाड्यांची अंमलबजावणी कोर्टा मार्फत करता येईल.
खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. तसेच लोकन्यायालयात निकाली निघणा-या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फी परत मिळते. तरी पक्षकार बांधवांनी सदर लोकन्यायालयाच्या माध्यमातुन आपली प्रकरणे तडजोडीने निकाली करून घेण्यासाठी राष्ट्रीय लोकअदातीमध्ये मोठ्या प्रमणात सहभाग घ्यावा असे अवाहन वणी तालुका विधी सेवा समीतीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश के. के. चाफले यांनी केले आहे