Home Breaking News भयावह…वाघ दिसताच तो चक्क.. झाडावर चढला..आणि..!

भयावह…वाघ दिसताच तो चक्क.. झाडावर चढला..आणि..!

1449

मारेगाव(को)शिवारातील घटना

वणी: तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) शिवारात सकाळी 11 वाजताचे सुमारास तरुणाला वाघाचे दर्शन झाले. वाघ साक्षात समोर दिसताच भयावह अवस्थेत तो झाडावर चढला. खाली वाघ आणि झाडावर तो…!  यास्थितीत त्याने मोबाईल वरून मदतीची याचना केली आणि त्याचा जीव वाचला.

तालुक्यात वाघाचा मुक्त संचार सुरू आहे. रासा, मारेगाव, सुकनेगाव परिसरात वाघाचा वावर दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात शेतकऱ्याच्या बैलावर वाघाने हल्ला करून बैलाला जखमी केले होते. तसेच नवरगाव येथील शेतकऱ्याची कालवड वाघाने ठार केली होती. पट्टेदार वाघाचा वावर परिसरात असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मारेगाव (को) येथील विशाल ठाकरे हा  तरुण सकाळी 11 वाजताचे सुमारास आपल्या शेतात जाण्याकरिता निघाला होता. त्याच्या शेता लगतच झुडपी जंगल आहे, विशाल शेतात जात असतांना त्याला साक्षात समोर वाघ बसलेला दिसला.  वाघ पाहून विशाल प्रचंड घाबरला. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. त्याने लगेचच एक झाडाचा सहारा घेत तो झाडावर चढला.

विशाल झाडावर आणि वाघ खाली अशी गंभीर स्थिती निर्माण झालेली असताना त्याने प्रसंगावधान राखून आपल्या मित्रांना व परिसरातील शेतात काम करणाऱ्याना फोन करून माहिती दिली. सर्वांनी शेताकडे धाव घेतल्याने वाघाने जंगलात धूम ठोकली.

ती वाघीण असल्याचे बोलले जात असून तिच्या सोबत दोन बछडे असण्याची शक्यता आहे. वाघाचा पावलांच्या खुणा सोबतच बछड्यांच्या ही पावलांचे ठसे आढळून आले आहे. या बाबत वन विभागाला माहिती देण्यात आली असून वाघाचा हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा लावण्यात आला आहे.